शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रस्ताव चांगला व नवा विचार मांडणारा असला तरी त्यामागे प्रचलित शिक्षण पद्धतीत, विद्यापीठ क्षेत्रात बदल करण्याचा तसेच मागील दहा-पंधरा वर्षांत वितरित झालेले काही भूखंड मिळविण्याचा उद्देश असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.
सत्ता बाकावरील योगेश सागर, अ‍ॅड. पराग अळवणी, माधुरी मिसाळ, स्नेहलता कोल्हे, डॉ. संजय कुटे, सुनील प्रभू, राजाभाऊ वाजे, डॉ. शशिकांत खेडेकर, अजय चौधरी, राहुल कुल यांनी काळानुरूप शिक्षण पद्धती तसेच परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव नियम २९३ अन्वये मंगळवारी विधानसभेत सादर केला. यावर बोलताना जयंत पाटील यांनी शिक्षणात उत्तरदायित्व यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. केवळ उच्च शिक्षणात बाहेरच्या गुंतवणुकीला प्राधान्य द्या. खासगी विद्यापीठे येऊ द्या. शासकीय व खासगी विद्यापीठात स्पर्धा झाली तरच गुणवत्ता वाढेल. महाविद्यालयीन निवडणुका सुरू केल्यास नवे प्रश्न व नवे अस्त्र निर्माण होतील. त्यामुळे शक्यतोवर निवडणुका टाळाव्यात. विद्यार्थी वर्गात बसण्याऐवजी पुस्तकी ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण क्षेत्रावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला तर मर्यादा येतील. त्यामुळे कमीतकमी हस्तक्षेप करून जास्तीत जास्त लवचिकव उदात्त असले पाहिजे. कुठलाही निर्णय घेण्यासाठी सदस्यांची एक समिती तयार करा, अशी सूचना त्यांनी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी बहुशाखीय अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी सूचना केली. ‘एमकेसीएल’ची मक्तेदारी संपवून व्होकेशनल अभ्यासक्रमात मूलभूत बदल करावा. कृषी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन आदींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश असावा. ‘सीईटी’त एक मोठे अर्थकारण दडले असून मोठे स्कंॅडल निर्माण झाले आहे. त्यातील अनेकांनी महाविद्यालयेही सुरू केली असल्याचा आरोप त्यांनी केला. सिंदखेडराजामध्ये महिलांसाठी विद्यापीठ सुरू करण्याची मागणी डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केली. पतंगराव कदम यांनीही काही सूचना केल्या.  

‘बदली नव्हे कारवाईचे निर्देश’
नागपूर:सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी मंगळवारी सभागृहात दिले. तसेच बदलापूर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडून पदाचा कार्यभार काढून घ्यावा आणि नियमित मुख्याधिकाऱ्यांची ताबडतोब नेमणूक करावी, असे निर्देश त्यांनी दिले. लोकसत्ताच्या १७ डिसेंबरच्या अंकात प्रकाशित वृत्तात ‘सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे डावखरेंचे निर्देश’ असा त्याचप्रमाणे उपसभापती वसंत डावखरे यांचा तालिका सभापती म्हणून असा अनवधानाने उल्लेख झाला, याबद्दल दिलगीर आहोत.