नगर शहरातून विधानसभा, लोकसभेवर निवडून जाणारे मतदारांना गृहीत धरून चालले आहेत. आपण विकासाचे काही काम केले नाही तरी लोक आपल्याला आपोआप निवडून देतात, विकासाची दृष्टी नसली तरी आपल्याशिवाय लोक कोठे जातील, असा त्यांचा समज झाला आहे. त्यामुळेच नगर शहरात परिवर्तन घडवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मनपा निवडणूक प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी दुपारी शहरातील गांधी मैदानात झाली, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आ. बबनराव पाचपुते, आ. अरुण जगताप, जि. प.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने या वेळी उपस्थित होते.
शहराच्या नेतृत्वाकडे विकासाचा व दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळे नगर हे महत्त्वाचे शहर असूनही इतर शहरांच्या तुलनेत मागे पडले. शहर विस्तारत आहे, साडेचार लाख लोकसंख्या होऊनही एक खेडेच राहिले याचे मनाला अतिशय दु:ख होते, अशी खंत व्यक्त करून चव्हाण म्हणाले, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नांदेडसारखा वेगाने विकास करायचा तर महापालिकेतही केंद्र व राज्य सरकारशी सुसंगत विचारांची सत्ता हवी, नगर व केडगावची पाणी योजना, भुयारी गटार योजना, घरकुल योजना पूर्ण करण्यासाठी मंत्र्यांची, सरकारची दारे ठोठावणारे, मजबूत लोकप्रतिनिधी हवे आहेत, काँग्रेस आघाडीने जाहीरनाम्यात दिलेले प्रत्येक आश्वासन कृतीत आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची मदत लागणार आहे, त्यासाठी जातीयवादी विचार करणारे नको तर सर्व धर्माला सामावून घेणारे सक्षम नेतृत्व हवे आहे.
युतीचे शहरातील नेतृत्व दुबळे, दूरदृष्टीचा अभाव असलेले आहे, ते विकास करूच शकत नाही, आघाडीकडे सत्ता दिल्यास विकासाचा सर्वच अनुशेष भरून काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. नगर शहरात गेली अनेक वर्षे काहीच बदल होत नाही, येथील बाजारपेठांना उतरती कळा लागली, पाणी मिळत नाही, रस्ते व्यवस्थित नाहीत, इतर शहरे पुढे गेली, याचे नगरच्या लोकांना काहीच वाईट कसे वाटत नाही, सेना-भाजप युती जातिधर्मात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे, हे इतकी वर्षे नगरकर कसे  सहन करतात, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. याचा आताच विचार केला नाही तर नगरला वाचवायला कोणीच येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आम्हाल पूर्ण बहुमताने सत्ता द्या, नाही विकास झाला तर जाब विचारा, दर चार महिन्यांनी नगरच्या योजनांचा आढावा घेऊन राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे सांगून पवार म्हणाले, की नवनीतभाई बार्शीकर यांनी शहराची ओळख निर्माण केली, त्यानंतर आता लाथ मारीन तेथे पाणी काढीन, अशी धमक असलेल्या आघाडीला सत्ता द्या, काठावरचे बहुमत नको, त्यातून घोडेबाजाराचा त्रास होतो, महापौर नगरसेवकांना सांभाळताना बेजार होतो, बंडखोरांनाही खडय़ासारखे बाजूला काढा, असे पवार यांनी सांगितले.
ठाकरे यांच्यासह पालकमंत्री पिचड, महसूलमंत्री थोरात, कृषिमंत्री विखे, आ. बबनराव पाचपुते, आ. सुधीर तांबे, आ. अब्दुल सत्तार, आ. एम. एन. शेख, अंकुश काकडे, जयंत ससाणे, संग्राम जगताप, विनायक देशमुख आदींची भाषणे झाली.
 आमदार काय विकास करणार?
‘दस का बीस’ करणा-याला निवडून दिले जाते म्हणूनच नगर शहराची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. पाच वेळा निवडून येणारा ‘रस्त्यावाचून काय अडले, विकास तर होतच असतो असे जर आमदार म्हणत असेल तर नगरचे लोक हे कसे सहन करतात याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, वा रे, पठ्ठय़ा! त्याला म्हणावं माझी बारामती बघ, रस्ते कसे असतात आणि विकास कसा होतो. नगर अर्बन बँकेचीही खासदाराने दुरवस्था करून टाकली, कधी काय होईल ते सांगता येणार नाही. असे आमदार-खासदार ज्या शहरात आहेत, तेथे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जरी राज्य करायला आले तरी नगरकरांचे काही खरे नाही.