येत्या दोन वर्षांत विदर्भात वेकोलीच्या २४ कोळसा खाणी सुरू केल्या जाणार असून, शेतकऱ्यांना स्वस्त वीज देण्यासाठी पैनगंगा कोळसा खाण प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ही खाण सुरू झाल्यानंतर या भागातील स्थानिकांना रोजगार तर प्राप्त होईल. तसेच नवीन भूसंपादन कायद्यानुसार १२५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. या खाणीचा संपूर्ण कोळसा महाजनकोला देण्यात येणार असून स्वस्त विजेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितच परिवर्तन घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील पैनगंगा प्रकल्प विरूर (गाडेगाव) येथील कोळसा खाणीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल, हंसराज अहीर, चंद्रशेखर बावनकुळे व वेकोलीचे अधिकारी उपस्थित होते, नागपूर जिल्ह्य़ातील मकरधोकडा व भानेगाव येथील कोळसा खाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी राष्ट्राला अर्पण करण्यात आल्या.
कोळशावर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था वेकोलीने विदर्भात निर्माण करावी, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. हैदराबाद ते नागपूर रस्ता इंडस्ट्री कॉरिडॉर होणार असून या भागातील युवकांना रोजगार मिळेल. देशाला २२ टक्के वाहकांची गरज आहे. वेकोलीने या भागातील युवकांना प्रशिक्षित करावे. कोळशापासून युरिया तयार करण्यासाठी या भागात एखादा कोलब्लॉक दिल्यास येथील शेतकऱ्यांना ४० ते ४५ टक्के स्वस्त दराने खते मिळतील. विदर्भाला हरित प्रदेश बनविण्यासाठी कोळसा खाणीच्या पडीक जमिनीवर जंगल उभारण्याची योजना तयार करावी. ताडोबाचा पर्यटन विकास केल्यास येथील युवकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले.
पैनगंगा खाणीतील सर्व कोळसा महाराष्ट्राला देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केली. कोराडी येथे २०० खाटांचे रुग्णालय व नागपुरात कॅन्सर रुग्णालय वेकोली उघडणार आहे. स्वस्त वीज देण्यासाठी ७० लाख टन कोळसा दरवर्षी राज्याला देण्यात येईल, असेही गोयल म्हणाले. या परिसरातील ५१४ युवकांना नोकरी मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले, तर स्वस्त वीज देण्यासाठी या खाणीचा फायदा होईल, असे ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले. या भागातील बोरगाव व गाडेगाव ही दोन गावे विकासासाठी वेकोलीने दत्तक घेतली आहेत.