इंटरनेट व मोबाइलच्या माध्यमातून मुलाखती घेत धुळ्यातील शिरपूर येथील सुशिक्षित बेरोजगाराला नोकरीचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे व दिल्ली येथील पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलायं.

शिरपूर येथील वासुदेवबाबा नगर येथे राहणाऱ्या ललित चौपाळे (वय २६) याने एमएससी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी अनेक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. त्यात मॅक्स जॉब प्लेसमेंट नावाच्या कन्सल्टन्सी कंपनीकडे त्याने हजार रुपये भरून नोंदणी केली होती. त्याला १६ मार्च रोजी विजय भारद्वाज (रा. दिल्ली) यांनी ई-मेलद्वारे नोकरीची हमी दिली. त्यानंतर २० मार्च रोजी रिया ठाकूर हिने मडास या कंपनीत एचआर या पदावर काम करत असल्याचे सांगून त्याची मोबाइलद्वारे मुलाखत घेऊन निवड झाल्याचे कळविले. त्यावेळी तिने ४ हजार रुपये भरण्यास सांगितले. पुन्हा काही वेळाने १२ हजार ५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करायला सांगितले. नोकरी मिळत असल्याने ललितने सांगितल्याप्रमाणे बँकेत पैसे जमा केले. त्यानंतर २१ मार्च रोजी ललित चौपाळे याला ई-मेलद्वारे १ लाख २० हजार रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाल्याचे कळविण्यात आले.

त्यानंतर रिया ठाकूर हिने सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाने ललित चौपाळे याला २३ हजार ५०० रुपये जमा करायला सांगितले. त्याने ते पेटीएमद्वारे ऑनलाइन ट्रान्सफर केले. पुन्हा २७ मार्चला ३५ हजार रुपये व त्यानंतर एजंट डोनेशनसाठी त्याने ४५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने भरले. संबंधितांच्या मागणीनुसार ललितने एक लाख २० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर केले. याबाबत १३ एप्रिल रोजी ललितने पुणे येथे जाऊन संबंधित कंपनीत चौकशी केली असता कंपनीकडून असे व्यवहार केले जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ललित चौपाळे यांनी याप्रकरणी संशयित विजय भारद्वाज (रा. दिल्ली), रिया ठाकूर, कोमल कुमारी, ब्रिजेश बहादुरिया, राजेश (रा. सायबर सिटी टॉवर, मगर पट्टा पुणे) या पाच जणांविरुद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.