अद्वय हिरे यांची छगन भुजबळ यांच्याशी चर्चा

गैरव्यवहाराच्या आरोपावरून सध्या तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मालेगावच्या हिरे कुटूंबियांमधील राजकीय हाडवैर सर्वश्रृत आहे. परंतु भाजपा नेते अद्वय हिरे यांनी बुधवारी मुंबई सत्र न्यायालय भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असून त्याद्वारे या दोघा कुटूंबियांमध्ये दिलजमाई घडून आल्याचा अर्थ काढला जात आहे.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या माझगाव मतदार संघात पराभूत झाल्यावर भुजबळांनी सुरू केलेल्या सुरक्षित मतदार संघाची शोध मोहीम येवल्यात येऊन थांबली. त्यानंतर नाशिकच्या राजकारणात भुजबळांचा उत्तरोत्तर दबदबा वाढत गेला. जिल्ह्याच्या विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भुजबळ सांगतील तोच शब्द प्रमाण समजला जाऊ लागला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी काळात चौदा-पंधरा वर्षे ते मंत्रिमंडळात होते. काही काळ उप मुख्यमंत्रिपदासारखे महत्वाचे पदही पक्षाने त्यांच्याकडे सोपविले होते. राष्ट्रवादीतील वजनदार नेते अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या भुजबळांच्या जिल्ह्यातील पक्षांतर्गत विरोधकांची मात्र मोठीच राजकीय पिछेहाट झाल्याचे बघावयास मिळाले. स्वपक्षाच्या उमेदवारांच्या वेळोवेळी झालेल्या पराभवाचे खापर त्यामुळे अनेकांनी भुजबळांवर फोडले होते. स्वार्थी तसेच जातीय राजकारण करण्याचे आरोप त्यांच्यावर झाले.

जिल्ह्यात भुजबळांचे प्रस्थ वाढण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मालेगावच्या हिरे कुटूंबियांचा दबदबा होता. या कुटूंबाचे वारसदार माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे यांना २००४ व २००९ अशा सलग दोन निवडणुकामंध्ये पराभव पत्कारावा लागला. त्यावेळी पक्षांतर्गत विरोधक म्हणून भुजबळांनी केलेल्या दगा फटक्यामुळेच हिरेंना पराभूत व्हावे लागल्याचे आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केले होते. या साऱ्या स्थितीत एकाच पक्षात राहुनही हिरे व भुजबळ कुटूंबियांमध्ये टोकाचे हाडवैर निर्माण होत गेले. दरम्यानच्या काळात पक्षात घुसमट होत असल्याची तक्रार करत हिरे हे भाजपवासी झाले. इतकेच नव्हे तर, मालेगाव बाह्य़ हा पारंपरिक व तुलनेने सोपा मतदार संघ सोडून अद्वय हिरे यांनी २०१४ मध्ये शेजारच्या नांदगाव मतदार संघातून भाजपची उमेदवारी घेऊन थेट भुजबळांचे पुत्र पंकज यांनाच आव्हान दिले होते. अर्थात त्यात यश आले नसले तरी भुजबळांना पराभूत करण्यासाठीची हिरेंनी दाखवलेली कमालीची इर्षां लपून राहिली नव्हती.

या पाश्र्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या तालुका पंचायत समिती सभापती निवडणुकीत पंधरा वर्षे सत्तेत राहिलेल्या शिवसेनेला पायउतार करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हिरे यांना राष्ट्रवादीची मोलाची साथ लाभली. या तडजोडीत भुजबळ समर्थक राष्ट्रवादीच्या एकमेव सदस्याला सभापतीपदाची लॉटरी लागली आणि भाजपच्या पदरात फारसे काही पडले नाही तरी सेनेला सत्तेतून घालविण्यात यश आल्याने हिरे समर्थक आनंदले. या निवडणुकीच्या विजयी सभेत बोलतांना हिरे यांचा भुजबळांच्या विरोधातील आधीचा सूर पालटल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते.

बुधवारी कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना नियमित तारखेसाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी अद्वय हिरे यांनी न्यायालयाच्या आवारात त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केली. या राजकीय घडामोडींची जिल्ह्य़ाच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात अद्वय हिरे यांच्याशी संपर्क साधल्यावर वैयक्तीक न्यायालयीन कामासाठी गेलो असतांना भुजबळांशी योगायोगाने भेट झाल्याचे त्यांनी नमूद केले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगतानाच भुजबळ व आमचे भिन्न राजकीय पक्ष असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दुसरीकडे भुजबळ व हिरे हे परस्परांचे राजकीय विरोधक असले तरी राजकारणाच्या पलीकडे दोघांमध्ये असलेली ‘कटूता’ कमी होण्याच्या दृष्टीने उभयतांमधील भेट सहाय्यभूत होईल, असा विश्वास भुजबळांच्या एका निकटवर्तीयाने बोलून दाखवला.