अधिवेशनात पहिले दोन आठवडे राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या विरोधात किल्ला लढवला, त्यावेळी कुठे गेले होते काँग्रेसचे नेते, असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नारायण राणे यांच्या विधानावर टीका केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षातील नेते आक्रमक नसून बोथट झाल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, नारायण राणे यांची व्यथा समजू शकतो. कोण बोथट आणि कोणाची धार गेली आहे, हे राणे यांना माहित आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवडय़ात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सत्तापक्षाला अनेकदा अडचणीत आणले त्यावेळी काँग्रेसचे नेते कुठे होते? विरोधी पक्षनेत्याची निवड एक दिवस आधी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या आधी काँग्रेसचा एकही नेता सभागृहात बोलत नव्हता. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. बोथट कोण आहेत, हे राणे यांनी समजून घ्यावे, अशी टीका भुजबळ यांनी केली.
सभागृहात काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राणे यांना त्याची माहिती नसावी म्हणून त्यांनी असे विधान केले असावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले