विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करण्यासाठी व पॅकेजचाही आढावा घेण्यासाठी मंगळवारी येथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन खेडय़ांना भेटी देऊन िपपरी येथे रात्री मुक्काम करून एका शेतकऱ्याच्या घरी भरीत-भाकरीचे जेवणही घेतले.
यवतमाळपासून २२ किलोमीटरवरील पंधराशे लोकसंख्येच्या िपपरी बुटी या खेडय़ात रात्री ११ वाजता भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. १३ एकर शेती असलेल्या विष्णूजी रंगराव ढुमणे यांच्या घरी जमिनीवर पंगतीत बसून निसर्गशेतीतून पिकवलेल्या हिरव्या काटेरी वांग्याचे भरीत, ज्वारीची भाकर, हिरव्या मिरचीचा ठेचा, दाळभाजी आणि भात, असे जेवण घेतले. इतकेच नव्हे, तर त्यांच्याच घरी रात्री मुक्कामही केला. असे करणारा पहिला मुख्यमंत्री, अशी त्यांची नोंद झाली आहे. या जिल्हय़ाने वसंतराव व सुधाकर नाईक हे दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले; पण त्यांनीही कधी असा इतिहास घडवला नाही. मुख्यमंत्र्यांनी घोडिखडी आणि रातचांदणा या दोन खेडय़ांनाही भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद
साधला.
या भेटीत त्यांच्यासोबत पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, संजय रेड्डी, डॉ. अशोक उईके, राजू नजरधने, तसेच प्रधान सचिव परदेशी, आयुक्त ज्ञानेश्वर  राजूरकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनीही या गावात मुक्काम केला.
 िपपरी बुटी येथे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींशी चर्चा केली. रातचांदणा येथील प्रगतिशील शेतकरी अरिवद बेंडे यांच्या शेताला मुख्यमंत्री, पालकमंत्री व मान्यवरांनी भेट देऊन त्यांनी शेतात उभारलेल्या नेटशेडची पाहणी केली.

‘सिंचनाशिवाय पर्याय नाही’
शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने त्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत; परंतु तात्काळ दिलासा देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले असून यातून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. येत्या जूनअखेर चांगले परिणाम दिसून येतील. कापूस उत्पादकांसाठी सूतगिरण्या, टेक्सटाइल्स झोन्स सुरू करण्यावर भर, तसेच सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा मानस आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात सिंचन विहिरींची कामे झाली नाहीत. येत्या जूनपर्यंत प्रलंबित सर्व विहिरी पूर्ण करण्यात येतील. शिवाय, त्यांना वीज कनेक्शन दिले जातील, असे मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.