अॅट्रोसिटी कायद्याचा काही जणांकडून दुरुपयोग केला जात असल्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची मागणी पुढे आली आहे. पण या कायद्याचे उद्दिष्ट स्पष्ट असून त्यामध्ये आपण फेरबदल करूच शकणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले. त्याचबरोबर या कायद्याचा जर कोणी गैरवापर करत असेल, तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायीच नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून विधानसभेतील चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या घडामोडींचा आढावा घेत आधीच्या सरकारने या संदर्भातील निर्णय घेताना केलेल्या उणीवाही सभागृहात दाखवून दिल्या. याच भाषणात त्यांनी अॅट्रॉसिटीवरही भाष्य केले. या कायद्याचा काही जणांकडून दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आला होता.

ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री

या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, अॅट्रॉसिटी कायदा रद्द तर करता येणारच नाही. पण त्यामध्ये फेरबदलही करता येणार नाहीत. हा कायदा आणण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे कायद्यात आता कोणताही बदल करता येणार नाही. देशाचा विचार करता दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक खालचा आहे. अगदी अॅट्रॉसिटीचे सर्वाधिक गुन्हे दाखल झालेल्या पहिल्या दहा राज्यांमध्येही महाराष्ट्र नाही. ही राज्यासाठी चांगलीच गोष्ट आहे.

तर तो बाबासाहेबांचा अनुयायी नाही
जर कोणी अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करत असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायीच नाही. तो संबंधित जातीचा नक्की असेल, पण बाबासाहेब आंबेडकर यांचा तो अनुयायी असूच शकत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आल्यानंतर दलित समाजाकडूनही संविधान सन्मान मूक मोर्चा काढण्यात आला. राज्यात अशा पद्धतीने एकमेकांविरोधात मोर्चे निघणे महाराष्ट्राला शोभणारे नाही. प्रगल्भ लोकशाहीमध्ये या दोन्ही समाजांनी एकमेकांसमोर उभे राहू नये, असे आपल्याला वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले. दलित समाजाचा इतरांच्या आरक्षणाला विरोध नाही. फक्त अॅट्रॉसिटी कायद्याला कोणताही धक्का लावू नका, एवढीच त्यांची अपेक्षा असल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.