शहरातील किलेअर्क परिसरात सिडकोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या हज हाऊस व वंदे मातरम् सभागृहाचे भूमिपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले खरे; पण कार्यक्रमस्थळी चित्र होते रिकाम्या खुच्र्या व सरकारी छापाचे भाषण!
कार्यक्रमासाठी उभारलेल्या भव्य शामियान्यात पाठीमागच्या बाजूने बहुतांश खुच्र्या रिकाम्याच होत्या. चव्हाण यांचे भाषणही तसे रंगलेच नाही, कारण त्यांना पुढच्या कार्यक्रमात जायची घाई होती. एकाच वेळी हज हाऊस व वंदे मातरम् या दोन्ही वास्तूंचे भूमिपूजन व्हावे, अशी इच्छा होती, ती अल्पसंख्य विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फलद्रुप केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सुमारे ३१ वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने अल्पसंख्याक व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पावले उचलत वंदे मातरम् सभागृहासाठी २३ कोटी ७५ लाख, तर हजहाऊससाठी ३० कोटी तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा व राजेश टोपे, अल्पसंख्य विभागाचे मंत्री नसीम खान, पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, मराठवाडय़ाच्या आणि देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचा महत्त्वपूर्ण इतिहास समजावा म्हणून, तसेच बंधुभावाने राहण्याची परंपरा कायम राहावी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला. औरंगाबाद शहर वेगाने वाढणारे आहे. मराठवाडय़ाचा मागासलेपणा दूर करताना उद्योगाला चालना देणारे हे शहर आहे. त्यामुळे डीएमआयसी प्रकल्पाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषत: शेंद्रा, बिडकीन भागात जमीन संपादित झाल्यानंतर अधिक वेगाने विकास करण्यासाठी प्रयत्न करू. मधल्या काळात पर्यटन विकास वाढीसाठी प्रयत्न केल्याने अर्थव्यवस्थेतही सुधारणा होईल, असे प्रयत्न केले जात आहेत. दुष्काळामुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे. उद्योगांना लागणाऱ्या पाण्यासाठी ८०० कोटींची योजना नुकतीच मंजूर केली. रोजा सोडण्याची आणि कार्यक्रमाची वेळ सारखीच असल्याने या कार्यक्रमासाठी उभारलेल्या शामियान्यात बहुतांश खुच्र्या रिकाम्या होत्या.

राणेंबाबत मौन
नारायण राणे नाराज असून ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत, त्यावर मत व्यक्त न करता मुख्यमंत्री चव्हाण यांनी या अनुषंगाने त्यांच्याशी माझे काही बोलणे झाले नाही, एवढेच वाक्य उच्चारले. नाराजीचे कारण माहीत नसल्याचे सांगत त्यांनी राणेंबाबत अधिक बोलणे टाळले.