नागपूर येथे महत्त्वाच्या संस्था नेण्यास आक्षेप आहे असे नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांचे मराठवाडय़ाकडे लक्ष नाही, असे दिसून येत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. मराठवाडय़ासाठी आयआयएम ही संस्था मिळावी, अशी मागणी होती. मात्र ती संस्था नागपूर येथे नेण्यात आली. नागपूरविषयीचा आक्षेप नाही. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस मराठवाडय़ाकडे लक्ष देत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे, असे सांगत चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले.
पावसाने दडी मारली आहे. पुरेसे कर्ज मिळत नाही, मात्र आता नव्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांकडे पसाच शिल्लक नाही. त्यामुळे त्यांना कर्जमाफी न दिल्यास शेतकरी आत्महत्या वाढत जातील. त्या थांबवण्यास कर्जमाफीचा प्रयोग पुन्हा करण्याची गरज आहे. या पूर्वीही दोनदा कर्जमाफी दिली. आता पुन्हा न झाल्यास शेतकरी अडचणीत सापडतील, असे चव्हाण म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नी राष्ट्रवादीसह एकत्रित आंदोलन होऊ शकते काय, या प्रश्नावर बोलण्याचे त्यांनी टाळले. हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, असे ते म्हणाले. चव्हाण स्वत: मोर्चात घोषणा देत सहभागी झाल्याने औरंगाबादमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मरगळ झटकत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
भाजप सरकारमधील चिक्की घोटाळा व बनावट पदवी प्रकरणावरूनही या वेळी टीका करण्यात आली. औरंगाबादचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांना विविध मागण्यांचे निवेदन या वेळी सादर करण्यात आले. मोर्चात आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, नितीन पाटील, अरुण मुगदिया, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे आदींसह अनेक कार्यकत्रे सहभागी झाले होते.
शेतकरी कर्जमुक्तीसाठी परभणीत काँग्रेसचा मोर्चा
वार्ताहर, परभणी
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. माजी मंत्री आमदार डी. पी. सावंत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
काँग्रेसने सरकारच्या विरोधात गुरुवारपासून राज्यभर आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, मराठा-मुस्लिम आरक्षण लागू करा, गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा, भाकड जनावरांच्या चाऱ्याची सोय करा अशा मागण्या करीत जिल्हा काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले होते. माजी मंत्री सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे, पक्ष निरीक्षक टी. पी. मुंढे, उपमहापौर भगवान वाघमारे, हरिभाऊ शेळके, डॉ. विवेक नावंदर, श्याम खोबे, रवी सोनकांबळे, पंजाब देशमुख, इरफान उर रहेमान खान, नागसेन भेरजे आदी मोर्चात सहभागी झाले होते.
शनिवार बाजार येथील पक्ष कार्यालयातून हा मोर्चा निघाला. देशमुख, वरपुडकर, मुंढे आदींनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.
भाजप-शिवसेनेचे सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे देणे-घेणे नाही, असा आरोप सावंत यांनी केला. देशमुख, वरपुडकर, मुंढे आदींनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. सावंत यांच्या भाषणानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. मात्र, कार्यकर्त्यांना गोळा करताना पदाधिकाऱ्यांचा बराच वेळ गेला. शिवाजी पुतळ्याजवळील मदानात मोर्चा येणार असल्याने तेथे चोख बंदोबस्त लावला होता. बाहेरगावाहून शेतकरी मोठय़ा संख्येने येतील, या साठी आयोजकांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली होती.
दुपारी २ वाजता मोर्चा येथे आला. मदानात बलगाडय़ा सोडून मोच्रेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळले. मात्र, मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे काही मोजके नेते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले. जिल्हाधिकारी राहुल महिवाल उपस्थित नसल्याने त्यांची वाट पाहत नेत्यांना थांबावे लागले. जिल्हाधिकारी आल्यानंतर निवेदन देण्यात आले.