दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी दोन तासांत पाच ठिकाणची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या त्यांनी ऐकून घेतल्या. याच वेळी वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ५० कोटी आणि पिण्याच्या पाण्यासाठी बीड जिल्ह्यास ८८ कोटी देऊ, असे सांगितले. मराठवाडय़ातील भीषण दुष्काळी स्थितीच्या पाहणीनंतर आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी ५ वाजता सौताडा येथून शेततळे, विहिरी, पिकांची पाहणी करीत मुख्यमंत्री रात्री उशिरा बीडला आढावा बठकीसाठी दाखल झाले. जागोजागी शेतकऱ्यांनी पाणी, चारा आणि हाताला काम देण्याची मागणी केली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दुष्काळी स्थितीची माहिती दिली.  पाणी-चाऱ्याचा प्रश्न कठीण असून कृष्णा खोऱ्यातील पाणी आष्टीला मिळावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना इतर योजनेतून मदतीचे आदेश त्यांनी दिले. हायड्रोकोनिक पद्धतीने चारा निर्मितीची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुळा धरणातून पाणी शेतीसाठी नव्हे तर  पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा प्रथमच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा परिणाम नेवासे, राहुरी, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेती व साखर उद्योगावर होणार आहे. येत्या महिनाभरातही पाऊस न झाल्यास आहे या पाण्यातूनच पुढच्या तब्बल पावणेदोन वर्षांचे नियोजन राज्य सरकारने सुरू केले आहे.

बीड दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड जिल्हाच्या दौऱ्यादरम्यान पौंडुळ येथील शेतकऱ्याच्या मुलाने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. आदिनाथ अंबादास लांडगे (वय २६) असे मृताचे नाव आहे. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. आदिनाथ हा एस. टी. महामंडळात कंत्राटी वाहक होता. शेतात विहीर खोदण्यासाठी महामंडळाच्या बँकेकडून सव्वालाख रुपयांचे कर्ज घेतले होते. जिल्हा बँकेकडून ५० हजार व इंडिया बँकेकडून ५० हजार कर्ज होते. तुटपुंजा पगार, घरखर्च व नापिकीमुळे कर्ज फेडण्याचा ताण आल्याने आदिनाथने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच डोणगाव (तालुका माजलगाव) येथील बाळू गोिवद राठोड या शेतकऱ्याने आत्महत्या केली.