आश्वासनांचा उधारीवरचा पाऊस असतानाच उसाच्या एफआरपीप्रश्नी एकीकडे स्वाभिमानीला गोंजारत साखर कारखान्यात मक्तेदारी असणाऱ्या राष्ट्रवादीलाही चुचकारण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीच्या दौऱ्यात केला. रविवारी जलयुक्त शिवारांतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी दुष्काळी पट्टय़ात मॅरेथॉन दौरा पार पाडला. या दौऱ्याने ना दुष्काळग्रस्तांच्या अपेक्षांना हिरवळ आढळली, ना सत्तेच्या मंदिरात पालखीचा मानकरी होण्याची इच्छुकांना संधी गवसली.
जतच्या विभाजनाचे,  म्हैसाळ योजनेला निधीचे कोणतेही ठोस आश्वासन या वेळी मिळाले नाही. लाल दिव्याची मनिषा धरून असणारे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत राहिले, मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचे कोणतेच सूतोवाच अथवा महामंडळात वर्णी लावण्याची घोषणा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली दौरा म्हणजे मागच्याच आश्वासनांची नव्याने घोषणा देण्याचा प्रयत्न ठरला. जिल्हा भाजपमय करण्याचे स्वप्न दाखवित सावलीसारखे सोबत राहिले ते खा. संजयकाका पाटील. यामुळे निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांना मागच्याच रांगेत जागा लाभली. दुष्काळी भागाचा दौरा असतानाही केवळ अग्रणी बारमाही करण्याचे आश्वासन देत प्रशासनाला मात्र शाबासकी देण्याची कामगिरी पार पडली. जनतेच्या आश्वासक नजरा मात्र मावळत्या दिवसाबरोबर कोमेजतच राहिल्या.
जलयुक्त शिवार अभियानाचे कोडकौतुक मुख्यमंत्र्यांच्या तोंडून करून घेण्यासाठी प्रशासनही आसुसलेले होते. अग्रणी नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे होत असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शासन दरबारी दिली. विटय़ाच्या सनदी अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहेच, मात्र या कामाबद्दल सनदी अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी यासाठीच हा दौरा आयोजित करण्यात आल्याचा गंध एकूण कार्यक्रमात येत होता.
याअगोदर प्रसिध्दीमाधमांना अग्रणीचे भरलेले पात्र दाखविण्याचा कार्यक्रम प्रशासनाने केला होताच. त्याचवेळी या कामाचे मार्केटिंग करण्याचे प्रयत्न होणार हे निश्चित होते. चांगल्या कामाचे जरूर कौतुक व्हायलाच हवे, मात्र जनतेच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण या दौऱ्यात झाले का? या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक मिळाले नाही.
आघाडीच्या मंत्र्यांचे कार्यक्रम असले तर फटाके, जाहिरातबाजी ठरलेली असायची, या वेळी मात्र तसे काही फारसे आढळलेच नाही. आटपाडीपासून जतपर्यंत व्हाया आरेवाडी या धनगरबहुल प्रदेशात काही नेत्यांनी धनगर आरक्षणासाठी हा खटाटोप करीत या दुष्काळी भागाच्या दौऱ्यात महामंडळावर वर्णी लावण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र त्यांनाही फारसे हाती लागले नाही. खा. पाटील यांनी दौऱ्याच्या अखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत राहण्यात धन्यता मानली. यामुळे भाजपाचे निष्ठावंत बाजूलाच राहिले.
जतच्या विभाजनाबाबतचे आश्वासन, ४२ गावच्या पाण्यासाठी ३२ कोटी देण्याची तयारी, सिंचन योजनेला रोहियोतून निधी देण्याची तयारी, दुष्काळी सवलतींसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगत बोळवण असे करीत धावता दौरा करीत मुख्य लक्ष असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतील प्रचार हेच या दौऱ्याचे फलित ठरले.
ऊस पट्टय़ात एफआरपीवरून स्वाभिमानीचे आंदोलन तापत असताना पसे एकरकमीचे तुकडे पाडण्यास शासन परवानगी देणार नाही, असे सांगत असतानाच शेतकऱ्यांची सहमती असेल तर कायदा आडही येणार नाही, असे स्वाभिमानीला गोंजारत साखर कारखानदारीत मक्तेदारी असलेल्या राष्ट्रवादीलाही चुचकारण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी सांगलीच्या दौऱ्यात केला. साखर पट्टय़ात अनेक कारखान्यांच्या वार्षकि सभेत हप्त्याने उस बिले घेण्यास मंजुरी घेण्यात आली आहे. यावरून कोणाला काय संदेश द्यायचा तो मुख्यमंत्र्यांनी दिला.
जाता जाता मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दुष्काळी तालुक्याचा निधी प्रस्थापित राजकारणी नेत्यांनी पळविल्याचा राजकीय बाँब टाकीत जिल्हा अंतर्गत राजकारणाला धग देण्याचा प्रयत्न केला असेच म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांचा दौरा खा. पाटील यांनीच हायजॅक केल्याने निष्ठावंत चार पावले दूरच आणि सामान्यांना फारसे पदरी पडले नसल्याने तेही दूरच. यामुळे या दौऱ्याने सांगलीच्या पदरात घसघशीत दान पडेल याचा भ्रमनिरास झाला.