निफाड तालुक्यातील सायखेडा येथे शेतात बिबटय़ाच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे. गोदाकाठालगतच्या या परिसरात गेल्या काही वर्षांत बिबटय़ाच्या हल्ल्यात आजवर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. सायखेडा परिसरात बिबटय़ाचा मुक्त संचार असल्याने पिंजरा लावण्याची मागणी केली जात होती. परंतु, वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. गोदावरी काठावरील गोदानगर येथे ही घटना घडली. या ठिकाणी शेतात शेतमजूर म्हणून महेश सोळसे व त्यांची पत्नी काम करत होते. त्यांचा मुलगा सार्थक हा खेळत होता. या वेळी अचानक बिबटय़ाने मागून झडप घालून त्याला उचलून नेले. हा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड करत बिबटय़ाच्या मागे धाव घेतली. आसपासचे ग्रामस्थही मदतीला धावून आले. बिबटय़ाने उसाच्या शेतात बालकाला ओढून नेले होते. गर्दी पाहिल्यानंतर तो बालकाला टाकून पसार झाला. गंभीर जखमी सार्थकला तातडीने चांदोरीच्या दवाखान्यात नेण्यात आले. तत्पूर्वीच त्याचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. निफाड तालुक्यात बिबटय़ांनी उच्छाद मांडला आहे. मागील काही वर्षांत बिबटय़ांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले. सायखेडय़ात बिबटय़ा भ्रमंती करत असल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली होती. परंतु, संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे बालकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.