मुलगा गंभीर जखमी; धुळे एमआयडीसीतील धक्कादायक प्रकार

शहरातील एमआयडीसीत अल्पवयीन कामगाराच्या शरीरात अघोरी पद्धतीने हवा भरण्याची आणि त्यामुळे तो मुलगा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधीत कंपनीवर बालमजुरी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी आणि बाल कामगारावर अत्याचार करणाऱ्या संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप पाटोळे आणि राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने मोहाडी पोलीस ठाण्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

१६ जून रेाजी एमआयडीसीतील उद्वैत एरिगेशन कंपनीत सुरेश ठाकरे या १५ वर्षीय कामगारावर जीवघेणा प्रसंग गुदरला. एका सहकारी कामगाराने अघोरी पध्दतीने सुरेशच्या शरीरात हवा भरण्याचा प्रकार केला. त्यामुळे पोट फुगून सुरेशची अवस्था गंभीर झाली आहे. सुरेश आपल्या विधवा आईसोबत एमआयडीसीत राहून उदरनिर्वाह करतो. त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्या प्रकारानंतर दोन दिवस तर उपचाराविना तो तडफडत होता. अखेर जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. योग्य ती मदत आणि संशयिताविरूध्द कारवाई होणे अपेक्षित असतांना त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे नगरसेवक पाटोळे आणि राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांंनी धाव घेत सहकार्य केले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन देण्यात आले असून यावेळी आण्णा कणसे, देविदास पवार, कुंदन पवार, गणेश पवार आदी उपस्थित होते. बालमजुरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे जिल्हा बालकामगार प्रकल्प प्राधिकरण अधिकारी तसेच कामगार अधिकारी आणि एमआयडीतील उद्योजकांविषयी संताप व्यक्त करीत संबंधीत उद्वैत एरिगेशन कंपनीत बाल कामगारावर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच अन्यायग्रस्त बालकामगाराचे योग्य ते पुनर्वसन करावे अशी मागणी  निवेदनातून करण्यात आली आहे.