प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना स्वच्छतागृह साफ करण्याबरोबरच माध्यान्ह भोजनासाठी वापरण्यात आलेली भांडी घासण्यास लावल्याचा प्रकार पलूस तालुक्यातील सावंतपूर वसाहतीच्या शाळेत उघडकीस आला. या प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल मिळताच शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून ७ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पलूस तालुक्यातील सावंतपूर वसाहतीमधील जिल्हा परिषद शाळेत गेल्या ४ दिवसांपासून शालेय मुलांना शालेय पोषण आहारासाठी वापरण्यात आलेली भांडी घासण्यास लावल्याचा धक्कादायक प्रकार घडत होता. मुलांच्या पालकांनी तक्रार जिल्हा परिषदेच्या सदस्या निशा पाटील यांच्या कानावर हा प्रकार घातला. श्रीमती पाटील यांनी सदर गंभीर प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांना सांगितला.
या प्रकाराबाबत पलूस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांच्या अहवालात सत्य परिस्थिती समोर येताच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बीना माने यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असल्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी सांगितले. तर शाळेत असलेल्या अन्य ७ शिक्षकांना या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून त्यांना १५ दिवसांत नोटिसीला उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आल्याचे श्रीमती वाघमोडे यांनी सांगितले.
या शाळेत चौथीपर्यंत वर्ग असून २७७ विद्यार्थिसंख्या आहे. एक मुख्याध्यापिका आणि सात सहशिक्षक कार्यरत असून निलंबित करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका श्रीमती माने यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. पोषण आहार शिजविण्यासाठी आणि मुलांना देण्यासाठी महिला बचत गटाला ठेका देण्यात आला आहे. धान्य निवडणे, शिजवणे आणि वाढण्यासाठी स्वतंत्रपणे बचत गटाला मोबदला दिला जात असल्याने मुलांना काम करण्यास लावणे चुकीचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.