पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेले आमचे वडील कमलसिंह हिडामी हे कधीच नक्षलवादी नव्हते. त्यांचा नक्षलवाद्यांशी कधीच कुठलाही संबंध नव्हता हो, असा आर्त टाहो कमलसिंहच्या मुलांनी फोडला असून त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
मंगळवार, २५ ऑगस्टला विशेष कृती दलाचे जवान कोरची तालुक्यातील मुरकुटी परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास पोलिस-नक्षल चकमक उडाली. यात कमलसिंह हिडामी जखमी झाले. नंतर पोलिसांनीच त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कमलसिंह हा एरिया रक्षक दलाचा सदस्य असून, तो बोंडे येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली, परंतु आता कमलसिंहच्या मुलांनी आपले वडील कधीच नक्षलवादी नव्हते. त्यांचा नक्षलवाद्यांशी कधीच कुठलाही संबंधही नव्हता, असे निवेदन दिल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. कमलसिंहचा मुलगा निलाराम हा कोरची येथील आयटीआयमध्ये कारपेंटरीचे शिक्षण घेत असून मुलगी राधिका नववीत शिकत आहेत.
निलाराम व राधिकाने जिल्हाधिकारी रणजितकुमार व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कोरची तालुक्यातील बोंडे येथील रहिवासी असून आईवडील व भाऊबहीण असे चौघाचे सुखी कुटुंब आहे. आमचे वडील कमलसिंह हे व्यवसायाने बेलदार असून गेल्या सहा महिन्यांपासून ते मयालघाट येथील पोलिस पाटील कमेनसिंह परसो यांच्या घराचे बांधकाम करत आहेत. २५ ऑगस्टला ४ वाजता कमलसिंह हिडामी हे मयालघाट येथील काम आटोपून गावाकडे परत येण्यास निघाले असता वाटेतील जंगलात सी-६० पथकाच्या जवानांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आम्हाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही कोरची पोलिस ठाण्यात गेलो असता तुमच्या वडीलांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आम्ही रुग्णालय गाठले, परंतु तेथे तैनात पोलिसांनी वडीलांना भेटू दिले नाही. यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसते, असेही निलाराम व राधिका हिडामी हिने म्हटले आहे. आमचे वडील निरपराध असून ते नक्षलवाद्यांच्या संपर्कात नव्हते. त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. असे असतांनाही पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या, असा सवाल या भावंडांनी केला असून दोषी पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.