चिपळूणच्या मराठी साहित्य संमेलनासाठी कोकणचे ‘भूमिपुत्र’ या नात्याने सर्वतोपरी सहाय्याचे आश्वासन दिलेले ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संमेलनाच्या परिसरातील मंडप व सजावटीसाठी दिलेले खर्चाचे अंदाजपत्रक दोन कोटींवर गेल्यामुळे संयोजकांचे डोळे पांढरे झाले. अखेर देसाईंच्या काही प्रस्तावांना कात्री लावत आता हा खर्च सुमारे सव्वा कोटी रुपयांपर्यंत आणण्यात आला आहे.
चित्रपटसृष्टीत कल्पक कला दिग्दर्शक म्हणून देसाई यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. ते मूळचे दापोली तालुक्यातील असल्यामुळे चिपळूण येथे भरणाऱ्या संमेलनाला त्यांच्या कलेचे योगदान लाभावे, यासाठी संयोजकांतर्फे काही महिन्यांपूर्वी देसाई यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनीही तत्परतेने सकारात्मक प्रतिसाद देत ही जबाबदारी स्वीकारली. संमेलनाचा मंडप आणि अन्य सजावटीबरोबरच संमेलनाच्या परिसरात अस्सल कोकणी खेडे उभारण्याची कल्पना त्यांनी सुचवली. त्यानुसार आराखडा तयार करुन गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष उभारणीला सुरवातही झाली. पण दरम्यान या सर्व कामासाठी साहित्याचा खर्च, मजुरी आणि मानधन मिळून त्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक संयोजकांना सादर केले. त्यामध्ये मुख्य मंडपासाठी ८५ लाख रुपये, कोकणी खेडय़ाच्या उभारणीसाठी ४० लाख रुपये, जनरेटर २० लाख रुपये, सांस्कृतिक कार्यक्रम १६ लाख रुपये, विद्युत रोषणाई १२ लाख रुपये इत्यादी खर्चाची तरतूद करण्यास सुचवण्यात आले. या व्यतिरिक्त या कामासाठी त्यांच्यातर्फे येणारे तंत्रज्ञ व कामगारांची भोजन-निवासाची संपूर्ण व्यवस्था संयोजकांवर टाकण्यात आली.
हे आकडे पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे संयोजकांचे डोळे पांढरे पडले आणि त्यांनी तातडीने यापैकी शक्य ती कामे स्थानिक पातळीवरुन करुन घेण्याचा, तसेच काही प्रस्तावांना सरळ कात्री लावण्याचा मार्ग स्वीकारला. तरी सुध्दा मंडप आणि इतर सजावट मिळून एकूण खर्च सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. स्थानिक पातळीवर एवढय़ा मोठय़ा स्वरुपाचे काम करण्याची क्षमता असलेले कंत्राटदार आणि साहित्य उपलब्ध नसल्यामुळे खर्चात वाढ झाली असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.