कोकणात उद्योगांचा विकास होऊन रोजगारनिर्मिती होण्यासाठी येथील नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योगपती दीपक गद्रे यांनी व्यक्त केले.
येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात गेल्या २७ व २८ नोव्हेंबर रोजी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला. ‘शून्य कचरा व्यवस्थापन’ हे मध्यवर्ती सूत्र असलेल्या या महोत्सवात गद्रे मरिन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ‘वसुंधरा सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कंपनीत निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन किंवा शक्य तेथे पुनर्वापर करण्याच्या अभिनव उपक्रमांबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. कंपनीचे संस्थापक दीपक गद्रे यांनी हे सांघिक कार्य असल्याचे नमूद करत कंपनीतील सहकाऱ्यांसह हा पुरस्कार सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅडव्होकेट विलास पाटणे यांच्या हस्ते स्वीकारला. या पुरस्काराला उत्तर देताना गद्रे म्हणाले की, आमच्या उद्योगातून भवतालच्या परिसराला दरुगधीचा त्रास होऊ नये म्हणून विविध प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान आम्ही सातत्याने स्वीकारत गेलो. त्यामध्ये सुरुवातीला अपयश आले. त्यामुळे काही प्रमाणात प्रतिकूल प्रतिक्रियाही सहन करावी लागली. पण आम्ही चिकाटीने विविध प्रयोग करीत कंपनीत निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थ किंवा सांडपाण्याचे उत्तम व्यवस्थापन केले. मात्र अशा प्रकारे कोकणात उद्योगांचा विकास होण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
बेसुमार मासेमारीमुळे माशांच्या नैसर्गिक पैदाशीला पुरेसा वाव मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त करून त्याबाबत मच्छीमारांचे प्रशिक्षण करण्याची गरजही गद्रे यांनी व्यक्त केली.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दोन दिवस चाललेल्या या महोत्सवातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शहरातील आठ शाळांमध्ये मिळून सुमारे अडीच-तीन हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण व शून्य कचरा व्यवस्थापनावरील चित्रपट दाखवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. गर्दे मरिन प्रकल्पातील कचरा व्यवस्थापनाबाबत कंपनीचे अधिकारी मंदार प्रभुदेसाई यांनी सादरीकरण केले. अनिल दांडेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. दत्तात्रय कांबळे यांनी आभार मानले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (२७ नोव्हेंबर) पणजीच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोले यांच्या हस्ते ठाण्याचे उद्योजक कौस्तुभ ताम्हणकर यांना घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तयार केलेल्या उपकरणाबद्दल ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार देण्यात आला. कचरा व्यवस्थापनासंदर्भात व्यक्तिगत पातळीपासून मानसिकता बदलण्याची गरज या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. महोत्सवानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही डॉ. इंगोले यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुखटणकर यांनी महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. किलोस्कर वसुंधरा क्लबतर्फे सुप्रिया चित्राव यांनी शून्य कचरा प्रणालीमागील संकल्पना स्पष्ट केली. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, सर्वोत्तम ठाकूर, दीपक गद्रे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Deputy Chief Minister Devendra Fadnavis challenges Uddhav Thackeray to show the good work he has done for Mumbai
मुंबईसाठी केलेले चांगले काम दाखवा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके