नगर शहर व परिसरात मतदारांमध्ये संमिश्र उत्साह जाणवला. एकुणात फारसा उत्साह जाणवला नाही. तुलनेने सावेडी, मुकुंदनगर या उपनगरांमध्ये उत्साह चांगला होता, मात्र शहराच्या मध्य भागात काहीशी उदासीनताच दिसत होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर बराच काळ शुकशुकाट होता. काही ठिकाणी निवडणुकीचे वातावरणही दिसत नव्हते.
सकाळी सात वाजता शहरात मतदानाला प्रारंभ झाला, मात्र सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण अगदीच अत्यल्प होते. त्यानंतर बऱ्यापैकी गर्दी सुरू झाली. साधारणपणे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेपर्यंत काही ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या, मात्र उन्हामुळे पुन्हा मतदारांची गर्दी रोडवली. या काळात बहुसंख्य मतदान केंद्रांवर शुकशुकाटच होता. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे बूथही नसल्याने मतदान केंद्रांच्या बाहेरही कार्यकर्ते किंवा मतदारांची गर्दी नव्हती. कुठे कोंडाळेही दिसत नव्हते. केंद्रांच्या परिसरातही निवडणुकीचे वातावरण जाणवत नव्हते. कार्यकर्त्यांचाही फारसा वावर नव्हता.
सावेडी उपनगर, मुकुंदनगर या भागांत मतदारांमध्ये तुलनेने चांगला उत्साह होता. रेसिडेन्शियल शाळेच्या (लाल टाकी) केंद्रांवरही मतदारांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. त्याही सातत्याने टिकल्या नाही, मात्र येथे तुलनेने समाधानकारक चित्र होते. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवसापूर्वी आठवडाभर अगोदर मतदारांना मतदान चिठ्ठय़ा घरपोच केल्या होत्या. या चिठ्ठय़ांवर मतदारांचे छायाचित्र होते. तसेच त्या घरपोच करताना दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची यादी तयार करण्यात आली. ती यादी मतदारसंघातील सर्व केंद्रांवर प्रशासनाने पाठवली. त्यामुळे मृताच्या नावावर दुसऱ्याच कुणीतरी मतदान करण्याचा प्रकार घडला नाही. काही ठिकाणी राजकीय पक्षांनी दोनशे मीटर अंतरावर बूथ लावले होते, पण तेथेही गर्दी कमीच होती. आधीच चिठ्ठय़ा मिळाल्याने मतदारांनी ओळखपत्र तसेच ओळख पटवण्यासाठी अन्य पुरावे आणले होते.
युतीत कुरबुरीचेच प्रदर्शन
शहरात भाजप-शिवसेना युतीतील खोलवर पोहोचलेली तेढ मतदानातही जाणवली. शिवसेनेने अलिप्ततेचे धोरण घेतल्यासारखीच स्थिती होती. निवडणुकीच्या प्रचारात ही तेढ उघडपणे चव्हाटय़ावर आली होती. त्यावर वादंग-वादही बरेच झाले, मात्र अनिच्छेनेच का होईना शहरातील शिवसेना काहीशी प्रचारात सक्रिय झाली होती. मात्र आज मतदानात कुठेही शिवसेनेचे अस्तित्व जाणवले नाही. त्यांचे नगरसेवक व नेतेही दिसले नाहीत अशी तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच मतदानाच्या दरम्यान केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळीच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचेही समजते. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील मतदारयाद्याही परत पाठवून दिल्याची तक्रार भाजपच्या या पदाधिकाऱ्याने केली. याबाबत प्रयत्न करूनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही, मात्र एका पदाधिकाऱ्याने भाजपच्या तक्रारी खोडून काढतानाच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणेच भाजपचे काम केल्याचा दावाही केला. उलट भाजपचेच बरेचसे कार्यकर्ते अलिप्त होते असेही या पदाधिकाऱ्यांने सांगितले.