वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी धरमतर खाडीतील अवैध रेती धंदे उद्ध्वस्त केले. रेती उत्खनन करणारे सक्शनपंप आणि बोटीही तोडून टाकल्या.
महसूल विभागाच्या कृपादृष्टीमुळे आणि राजकीय पाठबळामुळे जिल्ह्य़ात अवैध रेती उत्खननाला ऊत आला आहे. कुठलीही परवानगी नसताना रेती माफियाकडून बिनबोभाट रेती उत्खनन केले जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात सक्शनपंपाचा वापर करून रेतीचा उपसा करण्यास बंदी आहे. मात्र तरीही सक्शनपंपाचा वापर करून रेती उपसा केला जात आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने लोकांचा संयम सुटण्यास सुरुवात झाली आहे.
अलिबाग आणि पेण तालुक्याच्या किनाऱ्यावर असलेल्या धरमतर खाडीत गेल्या वर्षभरापासून अवैध रेती उत्खनन केले जात आहे. याबाबत अलिबाग तहसीलदार, पेण तहसीलदार, पोलीस यांच्यासह जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहे. पण रेती उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. अखेर संयम सुटलेल्या शहाबाज येथील ग्रामस्थांनी मंगळवारी धरमतर खाडीतील अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. रेती उत्खनन करण्यासाठी खाडी किनाऱ्यावर करण्यात आलेली अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केली आहे.
रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे सक्शनपंप, बोटी, पाइप ग्रामस्थांनी तोडून टाकले आहे. जेसीबी मशीनचा वापर करून अवैध रेती उत्खननाची केंद्रे नष्ट करण्यात आली आहे. या कारवाईत शहाबाज संघर्ष समितीसह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सहभागी झाले होते. यापुढे शहाबाज परिसरातील सर्व अवैध उद्योग सरकारी अधिकाऱ्यांची वाट न पाहता बंद करण्याचा निर्धार या निमित्ताने घेतला असल्याचे या वेळी द्वारकानाथ पाटील यांनी जाहीर केले आहे. ग्रामस्थ स्वत:हूनच असे उद्योग बंद करतील, असे जाहीर करून टाकले.
सध्या वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे वाळू लुटण्यासाठी नाना फंडे शोधून काढले जात आहेत. स्वत:कडे ट्रॅक्टर, ट्रॉली, जेसीबी अशी साधने नसली तरी भाडोत्री पद्धतीने आणून वाळूचा बेसुमार उपसा केला जात आहे. याचा परिणाम खाडीकिनारे कमकुवत होत आहेत. आधीच या विभागात विविध कंपन्यांनी प्रदूषण, जलमार्ग बुजविणे अशा विविध मार्गाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. त्यातच खाडीकिनारी सक्शनपंप लावून वाळू उपशाचे उद्योग सुरू असल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. शेवटी मंगळवारी सर्वानी एकत्र येऊन या बेकायदेशीर उद्योगासाठी बांधण्यात आलेले कच्चे बंधारे ग्रामस्थांनी तोडले, काढण्यात आलेली वाळू पुन्हा खाडीमध्ये टाकण्यात आली. तसेच सक्शनपंपासाठी व वाळू उपशासाठी आणण्यात आलेले पाइप ग्रामपंचायतीने जप्त करून कार्यालयात ठेवले आहेत. यापुढे धरमतर खाडी परिसरात रेती उपसा करू न देण्याचा इशारा यानिमित्ताने देण्यात आला आहे. अवैध रेती उत्खनन देणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही जोरदार चपराक असल्याचे बोलले जात आहे.