महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून जिल्ह्य़ात किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांतील समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता करण्यात आली. सात दिवसांत जवळपास १२५ टन कचरा गोळा करण्यात आला.

दरवर्षी हजारो टन कचरा समुद्रात वाहून येतो. यात ६० टक्के कचरा हा प्लास्टिक अथवा त्यापासून बनलेल्या वस्तूंचा असतो. प्लास्टिक कचऱ्याचा सागरी पर्यावरणावर घातक परिणाम होतो. मत्स्य प्रजाती, जलचर प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात येते.

दुसरीकडे समुद्रात टाकण्यात आलेला हा कचरा लाटांसोबत किनाऱ्यावर वाहून येतो, तो तसाच साचून राहतो. यामुळे किनारे अस्वच्छ होतात आणि मच्छीमार तसेच पर्यटकांचे आरोग्य धोक्यात येते.

ही बाब लक्षात घेऊन दरवर्षी जगभरात १७ सप्टेंबर हा दिवस जागतिक किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यात कोकण किनारपट्टीवरही गेल्या काही वर्षांपासून हा किनारा स्वच्छता दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. एकाच दिवशी सर्व समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता शक्य नसल्याने मेरिटाइम बोर्डाकडून दरवर्षी १७ सप्टेंबर ते ३० सप्टेबर या कालावधीत किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात येतो. या मोहिमेला स्थानिकांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभतो आहे.

रायगड जिल्ह्य़ाला २१० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. यात प्रामुख्याने उरण, अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांतील किनाऱ्यांचा समावेश आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या समुद्रकिनाऱ्यांना भेट देत असतात. सागरी पर्यटनाचा आनंद लुटत असतात.  अशा परिस्थितीत किनारे स्वच्छ राहावेत. जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांतील १२ समुद्रकिनाऱ्यांवर मेरिटाइम बोर्डामार्फत यावर्षी किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी आणि अधिकारी, जलक्रीडा व्यवसायिक यात सहभागी झाले आणि किनाऱ्यांची स्वच्छता केली गेली.

मोहिमेअंतर्गत किहिम येथे ६५ टन, आक्षी येथे ४ टन, श्रीवर्धन येथे ६ टन, हरिहरेश्वर येथे ६ टन, दिवेआगर ४ टन, काशिद येथे ८ टन, अलिबाग येथे १२ टन, मुरुड येथे १४ टन आणि रेवदंडा येथे ६.३ टन कचरा गोळा करण्यात आला आहे. म्हणजे जवळपास आठ दिवसांत १२५ टन कचरा श्रमदानाच्या माध्यमातून संकलित करण्यात आला आहे. यात २ हजारांहून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. हे या मोहिमेचे मोठे यश मानले जात आहे.  परिसर स्वच्छता ही सामुदायिक जबाबदारी आहे. किनाऱ्यांची स्वच्छता ही अभियानापुरती मर्यादित राहू नये. ती नियमितपणे सुरू राहणे गरजेचे आहे.

मेरिटाइम बोर्डाने १५ दिवसांसाठी हे अभियान राबविले असले तरी नागरिक आणि पर्यटकांनी निसर्गाचा आनंद लुटताना किनारे कचऱ्यामुळे विद्रूप होणार नाही याचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे मत मेरिटाइम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी सांगितले.