डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आले. शेकाप आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील आणि धर्यशील पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांमुळे दास परिवारात नाराजीचा सूर आहे. दोन्ही आमदारांच्या या कृतीचा ठिकठिकाणी निषेध केला जात आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून १६ नोव्हेंबर २०१४ ला राज्यात सर्वत्र महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’ने दखल घेतली. २०१६ सालच्या विक्रमांच्या यादीत या उप्रकमाची नोंद घेतली गेली. याबाबत शेकापचे आमदार पंडित पाटील व धर्यशील पाटील यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. या अनुषंगाने उपक्रमाची नोंद विक्रमांच्या यादीत झाली आहे काय, लोकसहभागातून राबवण्यात आलेले हे पहिले महास्वच्छता अभियान आहे काय, लिम्का बुक आफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे काय, अप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे खरे आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शेवटी या सर्व कार्याची दखल घेऊन डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा उचित सत्कार करण्यात येईल काय, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

दोन्ही आमदारांनी उपस्थित केलेल्या या तारांकित प्रश्नाने श्रीसदस्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला. या प्रश्नांमुळे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात असल्याची भावना दास परिवारात निर्माण झाली आहे. या प्रश्नांबद्दल माहिती मिळताच रायगड जिल्ह्य़ातील श्रीसदस्यांच्या बठका घेऊन निषेध करण्यास सुरुवात केली आहे. निरपेक्ष भावनेतून नानासाहेब प्रतिष्ठान विविध समाजोपयोगी उपक्रम राबवीत असते. लाखो भाविक मोठय़ा श्रद्धेने या उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. अशा कार्याबद्दल साशंकता व्यक्त करणे ही चुकीची बाब आहे. याचा आम्ही निषेध करतो असे मत डॉ. संदेश पाटील यांनी व्यक्त केले.