मुंबईसह राज्यातील इतर भागातील बंद पडलेले वस्त्रोद्योग प्रकल्प विदर्भात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अमरावतीचे आमदार डॉ.सुनील देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या चार प्रकल्पांमध्ये मुंबईतील इंदू मिलचाही समावेश असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांना याबाबत स्वत: गडकरी यांनी पत्रही दिले आहे.
मुंबईतील टाटा टेकसटाईल मिल, पोद्दार मिल, इंदू मिल आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मिल, हे चार वस्त्रोद्योग प्रकल्प अनेक दिवसांपासून बंद पडले असून राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळ हे चारही प्रकल्प इतरत्र स्थलांतरित करण्याचा विचार करत आहे. याकरीता नवीन जागेचा शोधही सुरू झाला आहे. हे प्रकल्प अमरावतीजवळील नांदगाव पेठच्या टेकसटाईल पार्कमध्ये ते सुरू व्हावेत, याकरीता अमरावतीचे आमदार डॉ.सुनील देशमुख यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची यासंदर्भात भेट घेऊन हे प्रकल्प विदर्भात आणण्याकरिता प्रयत्न करण्याची विनंती केली. गडकरींनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांनी गंगवार यांना स्वत: पत्र दिले असून, हे प्रकल्प अमरावतीत सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात मोठय़ा प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी असून, अमरावती व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मोठय़ा प्रमाणावर कापसावर अवलंबून आहे. नांदगावपेठ येथील टेकसटाईल पार्क हा अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. भरपूर जागा, प्रमुख शहरांशी असलेला संपर्क, पाणी व मजुरांची उपलब्धता यासारख्या गोष्टींमुळे हे ठिकाण वस्त्रोद्योग प्रकल्पांसाठी अत्यंत योग्य आहे. याशिवाय, या संपूर्ण प्रदेशात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड असल्याने टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे चारही प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आवाहन गडकरी यांनी गंगवार यांना या पत्राद्वारे केले आहे.

नांदगावपेठ आदर्श
‘अमरावती विभागात विकासाचा मोठा अनुशेष आहे. हे चार प्रकल्प नांदगावपेठ येथे आल्यास या परिसराचा मोठय़ा प्रमाणात लाभ होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी नांदगावपेठ येथे आदर्श स्थिती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याकरिता अनुकूलता दाखविली आहे,’ असे डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले.