काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी नारायण राणे यांच्या घरी गेले होते. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली असून फडणवीस आणि राणे यांचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा रंगली आहे. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. राणेंनीही याविषयी प्रतिक्रिया दिलेली नाही. ही चर्चा रंगली असतानाच शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नारायण राणे यांच्या निवासस्थानी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री गणपतीचं दर्शन घेत असतानाचा एक फोटोही ट्विट केला आहे. त्यामुळे राणेंची भाजपशी जवळीक वाढल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. राणे यांच्या भाजपप्रवेशातील सर्व ‘विघ्न’ दूर झाल्याची चर्चा रंगली आहे.

नारायण राणे यांनी काही महिन्यांपूर्वी अहमदाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त होते. या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. तर नारायण राणेंनी हे वृत्त फेटाळून लावले होते. मात्र गेल्या आठवड्यात भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक प्रतिक्रिया दिली होती. राज्याचे कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपत प्रवेश करणार असतील तर त्यांचे स्वागत आहे असे त्यांनी म्हटले होते. पक्षासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचा त्याग करण्यास तयार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले होते.