ज्या क्षणी आम्ही भ्रष्टाचाराचा अंगिकार केल्याचे सिद्ध होईल तत्क्षणी पदाचा त्याग करू, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते शनिवारी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांची पाठराखण करत विरोधकांवर जोरदार टीका केली. या कार्यक्रमाला एकनाथ खडसेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. रावसाहेब दानवे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या खुर्च्यांमध्ये एकनाथ खडसे यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती.

सरकार सध्या प्रामाणिकपणे काम करत असले तरी विरोधकांकडून काही मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. गोबेल्स तंत्राचा वापर करून सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कोणत्या तोंडाने सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचाऱ्यांनी आम्हाला शिष्टाचार शिकवू नये. प्रथम सरकारचे भूखंड परत करा मग आरोप करा, असे सांगत त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांची पाठराखण करताना ते लवकरच अग्निपरीक्षेतून सहीसलामत बाहेर येतील, असा विश्वास व्यक्त केला. खडसेंवरील प्रत्येक आरोप हा तथ्यहीन आहे. त्यांना दाऊदकडून कुठलाही कॉल आला नाही, हे एटीएसच्या तपासात सिद्ध झाले आहे. याशिवाय, गजानन पाटील प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचे एसीबीने स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार खणून काढा, त्यांचा बुरखा फाडा, असा आदेशही दिला.