नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी  केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले कोपर्डीला जायला निघाले होते, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करून माघारी बोलावल्याचे समजते. सध्या कोपर्डीमधील वातावरण तापले असून तुम्ही तिथे गेलात तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होऊ शकतो असे देखील त्यांना सांगण्यात आल्याचे समजेत. मुख्यमंत्रींच्या फोनमुळे रामदास आठवले यांना  विमानतळावरून परतावे लागले आहे.

कोपर्डी बलात्कार प्रकरणामुळे कर्जतमध्ये तणावाचे वातावरण आहे. पीडित कुटुंबियांना  सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही  तिथे गेल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळेल अशा प्रकराच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीडित कुटुंबियांची भेट न घेताच आठवले यांना परतावे लागले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले एकत्र या पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे.

दोन दिवसांपूर्वी भारिप -बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी नगरकडे रवाना झाले होते. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सांगत त्यांना नगर पोलीसांनी सीआरपीसी कलम १४९ अन्वये  प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. तसेच शिरूरजवळ त्यांची गाडी अडवत त्यांना कोपर्डीमध्ये न जाण्याच्या सूचना देखील पोलिसांनी केल्या होत्या.