काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांच्या गटातील शीतयुद्धाला अखेर तोंड फुटले असून कोठे गटाने अखेर आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’ बंगल्यावर कोठे यांचे पुत्र तथा सोलापूर महापालिकेचे सभागृह नेते महेश कोठे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
आपला शिवसेनेतील प्रवेशाचा निर्णय पक्का असल्याचे महेश कोठे यांनी स्वत: स्पष्ट केले. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आजी-माजी नगरसेवकही शिवसेनेत जाण्यास इच्छुक आहेत. कोठे गटाने ठरल्याप्रमाणे सेनेत प्रवेश घेतला तर शिंदे व कोठे यांच्यातील गेल्या ४० वर्षांपासूनचा घरोबा संपुष्टात येऊन स्थानिक काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडण्याचीही शक्यता राजकीय क्षेत्रात वर्तविली जात आहे. तथापि, या राजकीय घडामोडीत स्वत: विष्णुपंत कोठे हे अलिप्त राहिले आहेत.
महेश कोठे म्हणाले, उद्या बुधवारी आपण मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा आपला निर्णय कायम असून त्यात आता कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही. येत्या १० किंवा ११ ऑगस्ट रोजी सोलापुरात उद्धव ठाकरे हे येणार आहेत. त्या वेळी मेळावा घेऊन आपण उघडपणे भूमिका मांडणार असल्याचे कोठे यांनी सांगितले.
शिवसेना प्रवेशामागची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, कोठे कुटुंबीयांनी गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षाची अविरत सेवा केली आहे. परंतु त्याची कदर होत नाही तर अनेक दिवसांपासून पक्षात आपली व कुटुंबीयांची घुसमट सुरू आहे. ज्यांच्यासाठी आपले वडील विष्णुपंत कोठे यांनी अनेक वर्षे राजकारण केले, त्यांच्याकडूनच जर अवहेलना होत असेल, तर पक्षात राहण्यात अर्थ नाही. विष्णुपंत कोठे यांनी शिवसेना प्रवेशाला आपणास परवानगी दिली नसली, तरी आपण सेनेत जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुशीलकुमार शिंदे यांचे संपर्क कार्यालय प्रमुख म्हणून त्यांचे स्थानिक राजकारण सांभाळताना विष्णुपंत कोठे यांनी गेल्या ३० वर्षांपासून महापालिका स्वत:च्या ताब्यात ठेवली आहे. तथापि, गेल्या दहा वर्षांत शिंदे-कोठे यांच्यात दरी निर्माण झाली असून त्यामागचे कारण २००४ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा झालेला धक्कादायक पराभव असल्याचे मानले जाते. त्या वेळी आपण मुख्यमंत्री असतानासुद्धा पत्नीचा पराभव रोखू शकलो नाही, याची बोच शिंदे यांना कायम सतावत आहे. त्यानंतर त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी राजकारणात पदार्पण करून आमदार बनल्या. तर कोठे यांचे पुत्र महेश कोठे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तेव्हापासून आजतागायत शिंदे-कोठे गटात शह-प्रतिशहाचे राजकारण चालू असताना आता मात्र उभयतांतील शीतयुद्धाला तोंड फुटले आहे. महेश कोठे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उभे राहण्याचा निर्णय घेत शिंदे यांना थेट आव्हान दिल्याचे मानले जाते. काही दिवसांपूर्वी कोठे यांना पक्षशिस्त भंगाची कारणे दाखवा नोटीस प्रदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बजावली होती. त्या वेळी कोठे यांनी माघार घेत आपली तलवार म्यान केली होती. परंतु आता पुन्हा त्यांनी शिंदे यांच्यावर चढाई करण्याचे ठरविल्यामुळे सोलापूरचे राजकारण तापण्याची व त्यातून भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. यात कसलेले मुरब्बी राजकारणी सुशीलकुमार शिंदे हे कसे तोंड देतात, याकडेही सर्वाचे लक्ष वेधले आहे.