दिवाळी आटोपताच विदर्भात वेध लागले ते थंडीचे. कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. सकाळी आणि सायंकाळी थंडी वाढल्याने अनेक लोक उबदार कपडे परिधान करून बाहेर पडत आहेत. दिवाळीपूर्वी वातावरणात उकाडा असताना अचानक दिवाळी संपता संपता विदर्भात थंडीने डोके वर काढून तिचे अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी कपाटबंद असलेले स्वेटर, शॉल, कानपट्टय़ा, हातमोजे, जॅकेट वगैरे गृहिणींनी बाहेर काढायला सुरुवात केली आहे.
सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळातही बदल झाले असून लवकर थंडी पडू लागल्याने अनेक लोक उबदार कपडय़ांचा वापर करून पडू लागले आहेत. घरातील पंखे आणि कूलर आणि वातानुकूलित यंत्रे बंद झाली आहेत. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे सुटीच्या दिवशी अनेकांनी घरीच राहून आराम केला. शनिवारी रात्री शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा वाढला. तसे पाहिले तर विदर्भात असह्य़ होणारी थंडी फार कमी पडते. अतिशय तीव्र उन्हासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भात थंडीही अल्पकाळ का होईना वैदर्भीयांना चांगलीच गारठून टाकते. नागपूरचे आज दिवसाचे कमाल तापमान २६.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. येत्या रविवापर्यंत पारा एक-दोन अंशाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. मात्र, वातावरणात गार वारे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात राजकीय वातावरण गरम असताना विदर्भात ऑक्टोबरच्या शेवटी थंडीने डोके वर काढल्याने येत्या काही दिवसांमध्ये तिची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीचे अस्तित्व दिसत असल्याने थंडी जाणवायला लागली किंवा थंडीचे दिवस सुरू झाले, अशी वाक्ये कानावर पडू लागली. स्वेटर विकणाऱ्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात हजेरी लावली आहे. जसजशी थंडी वाढेल तसतसे नागपूरकर दुकानांकडे धाव घेतील, असा त्यांचाही अनुभव असल्याने सध्या थंडीतही त्यांचा धंदा थंड असला तरी लवकरच स्वेटरची गजबजलेली दुकाने सावरता सावरता त्यांनाही नाकी नऊ येईल.
ऐन दिवाळीत रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने वातारवणात सर्वत्र गारवा होता. दिवाळीत सायंकाळी घरासमोर सडा टाकून रांगोळी काढण्याची
परंपरा आहे, परंतु पावसाच्या थेंबांचा सडा आणि रांगोळी प्रत्येक घरासमोर दिसत होती.
दिवाळीच्या दिवसापासूनच आकाश ढगाळलेले होते, परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर काल भाऊबिजेला पावसाने रिमझिम हजेरी लावली. मात्र, सायंकाळी पुन्हा पाऊस बेपत्ता झाला. त्यानंतर आज पहाटे पुन्हा आकाशात सर्वत्र ढग एकत्र आले आणि सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळी आठच्या सुमारास काही वेळासाठी पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली.
रविवारी दिवसभर ती अधूनमधून सुरू होती. त्यामुळे ऐन थंडीत वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला. कालपर्यंत जेथे कडक उन्हाळ्यासारखे उन्हे पडत होती तेथे आज दिवसभर थंडी होती. पावसाची ही रिपरिप सायंकाळपर्यंत सुरूच असल्याने दिवाळीच्या बाजारावर त्याचा परिणाम झाला. आज दिवसभर शहरातील सर्व बाजारपेठा उघडय़ा होत्या, परंतु थंडी व पावसामुळे ग्राहक दिसत नव्हते.