महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची माहिती
टंचाई काळात टँकर लॉबी जोर धरते, राज्यात सर्वत्रच हा अनुभव येतो. खासगी पाणीपुरवठा करणारे टँकरचालक मनमानी पद्धतीने पाण्यासाठी दर आकारणी करतात, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अंतर व खर्च याची तपासणी करून सामान्यांना परवडतील असे दर ठरवतील, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हय़ातील दुष्काळ आढावा बैठक खडसे यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदी या वेळी उपस्थित होते. ह्लटँकर लॉबीचा सर्वाधिक अनुभव लातूरमध्ये आला. तेथे १५ दिवसांत एक कोटी लिटर पाणी मिळाल्यानंतर टँकरचे दर कमी झाले. गेल्या सात-आठ वर्षांपासून ही लॉबी तेथे कार्यरत होती,ह्व असे खडसे म्हणाले.
मद्यनिर्मितीच्या कारखान्यांना पाणीपुरवठय़ाचा प्रश्न न्यायालयात गेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकार मद्य कारखान्यांचे पाणी बंद करत नाही. न्यायालयाने सरकारला जाब विचारला आहे, याकडे लक्ष वेधले असता खडसे म्हणाले,ह्वन्यायालयाचा आम्ही आदर करतो. पाण्याचे प्रथम प्राधान्य पिण्यासाठीच आहे. मद्य कारखान्यांचे पाणी बंद करण्यापूर्वी वेगवेगळय़ा बाजू तपासाव्या लागतील. तेथील कामगारांच्या रोजगाराचाही प्रश्न आहे. पिण्यासाठी पाणी पुरवणे हे सरकारचे कर्तव्यच आहे, परंतु विरोधकांकडे मुद्दा नसल्याने आम्ही लातूरला रेल्वेने पाणी पोचवण्याचे ऐतिहासिक काम करूनही त्याचे कौतुक करण्याचे सोडून किरकोळ मुद्दय़ांकडे लक्ष वळविले जात आहे.
मराठवाडय़ाने चार मुख्यमंत्री दिले. ३५ वर्षे मराठवाडय़ाला मंत्रिपदे होती. लातूरला कॅबिनेट मंत्रिपद होते. परंतु पूर्वी मंत्र्यांना निर्णय घेण्याचेच अधिकार नव्हते. काय अवस्था करून ठेवली मराठवाडय़ाची? आम्ही झटपट निर्णय घेत आहोत. काँग्रेसकडे मुद्दाच नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनातही पक्षाची हीच अवस्था होती, असा टोला खडसे यांनी लगावला. पंकजा मुंडे यांच्या ‘सेल्फी’च्या मुद्यावर खडसे यांनी मुंडे यांचे समर्थनच केले. मुंडे काही स्वत:चा फोटो काढत नव्हत्या. केलेल्या कामाचेच फोटो त्या काढत होत्या, त्यात गैर काही नाही. काँग्रेस संभ्रमावस्थेत असल्याने दुष्काळाचे राजकारण करत आहे, अशीही टीका त्यांनी केली.

पायीसुद्धा फिरू..!
हेलिकॉप्टरच्या दौऱ्यासाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी केली, या आक्षेपावर बोलताना खडसे म्हणाले, मीडियामुळे माझ्यासह आता मुख्यमंत्रीही मोटारीनेच दौरा करू लागले आहेत. परंतु, आम्हाला एका दिवसात तीन-चार जिल्हय़ांत जावे लागते. बुधवारी मी मोटारीने सात तास दौरा केला. मुख्यमंत्रीही बुधवारी मोटारीनेच फिरले. परंतु वेळही महत्त्वाचा आहे. लोकांना लवकर निर्णय हवे असतात, परंतु मीडियामुळे शक्य तेथे मोटारीने जातो. यापुढे रेल्वेचाही वापर करू, आवश्यकता भासल्यास पायीसुद्धा फिरू.