बारावीची परीक्षा देण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश अनिवार्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेणे भागच ठरते, मात्र एकदा प्रवेश शुल्क भरल्यानंतर महाविद्यालयात रोज जायलाच हवे, असे वातावरण काही अपवाद वगळता किमान विज्ञान शाखेत राहिले नसल्याचे अलीकडच्या काळातील चित्र आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेता महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा शिकवणी वर्गावरच विद्यार्थी व पालकांचा अधिक विश्वास असल्यामुळे महाविद्यालयाचा प्रवेश नामधारीच ठरत असल्याचे दिसते.
लातूर हे शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील नामवंत महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी राज्यासह परप्रांतांतूनही विद्यार्थी येतात. या महाविद्यालयांत अकरावीच्या वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी असते. बारावीला मात्र ही संख्या चांगलीच रोडावते. नामवंत महाविद्यालयांतच ही स्थिती नाही, तर अन्य महाविद्यालयांतही हेच चित्र असल्याने प्राध्यापकांना दुसरे कामच उरत नाही. शिकवणी वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना धडपड करावी लागते. शिकवणी वर्गातही मोठी स्पर्धा असते. मात्र, विद्यार्थी, पालक या सर्वाचाच विश्वास शिकवणी वर्गावर वाढत आहे. चार वर्षांपूर्वी शाळांमध्ये पटपडताळणी केल्यानंतर विद्यार्थ्यांची पटावरील व प्रत्यक्ष संख्या यात मोठी तफावत आढळून आली. सध्या कनिष्ठ महाविद्यालयांबाबत अशी पटपडताळणी करायचे ठरवल्यास शिक्षण क्षेत्रातील हे वास्तव समोर येईल. राज्यातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेतलेले विद्यार्थी खास शिकवणीसाठी लातुरात येऊन वास्तव्य करतात व परीक्षा देण्यासाठी आपापल्या गावी जातात. स्थानिक महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असला, तरी ते नियमित वर्गात बसत नाहीत. त्यांची हजेरी पूर्ण दाखवण्यासाठी महाविद्यालये स्वतंत्र शुल्क आकारतात. अर्थात, तो व्यवहार कागदोपत्री नसतो.
कनिष्ठ महाविद्यालयांची ही अवस्था एकटय़ा लातूरची नाही. मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, नांदेड यांसारख्या शहरांपासून पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, ठाणे अशा सर्वच मोठय़ा शहरांत कमी-अधिक फरकाने हीच स्थिती आहे. इयत्ता पहिलीपासून शाळेपेक्षा शिकवणी वर्गावरच विसंबून राहण्याची सवय विद्यार्थ्यांना लावली जाते. त्यामुळे शाळेचे व नंतर महाविद्यालयाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक शाळांची वेळापत्रके शिकवणी वर्गाच्या वेळापत्रकावर अवलंबून असतात. शाळेनंतर महाविद्यालयीन जीवनात शिकवणी वर्गाचे महत्त्व अनन्यसाधारण बनत चालले असून, अकरावी व बारावीची दोन वष्रे विद्यार्थी जीवनात अतिशय महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे या कालावधीत शिकवणी वर्गाचे महत्त्व प्रचंड वाढते व महाविद्यालयाचे स्थान नामधारी बनते.
विनाअनुदानित विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांचे पेव मोठय़ा प्रमाणात फुटले. शिकवणी वर्ग चालवणाऱ्या मंडळींनीच अशी महाविद्यालये सुरू केली. ती, अर्थातच चांगली चालली आहेत. मात्र, त्यामुळेच अनुदानित विज्ञान कनिष्ठ महाविद्यालये कशासाठी व तेथील प्राध्यापकांना का सांभाळायचे? हा प्रश्न शिक्षण क्षेत्रात या निमित्ताने समोर आला आहे. साहजिकच विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांची काटेकोर पटपडताळणी करून शिक्षण क्षेत्रातील हे विदारक सत्य समोर आणण्याची गरज आहे. नव्या सरकारकडून हे धाडस दाखवले जावे, अशी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांची अपेक्षा आहे.
‘शिक्षणाच्या अध:पतनाला सरकार-पालकच जबाबदार’
‘मागेल त्याला महाविद्यालय देण्याची’ भूमिका सरकारमधील मंडळींनी घेतली. जिल्हा परिषद ते मंत्रालयापर्यंत फाइल हलवण्यासाठी ज्या बाबी कराव्या लागतात, त्या करून महाविद्यालयास मान्यता आणली जाते. शिकवणी वर्गामुळे अनुदानित महाविद्यालयातील मंडळी उघडपणे विद्यार्थ्यांला प्रवेश घ्या अन् परीक्षेला या, असे सांगतात. शिकवणी वर्ग व महाविद्यालयांची सरळ सरळ युती असते. शिक्षणातील हे अध:पतन उघडय़ा डोळय़ांनी पाहणारे पालकही त्यास तितकेच जबाबदार आहेत. शिक्षणात नवनवे प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी मुकेपणा सोडण्याची गरज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केली.