दोन ट्रक एकमेकांवर आदळल्याने भीषण आग लागून एका ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेल्या चौघांचा चौघांचा कोळसा झाला. भंडारा मार्गावर सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील मौदा गावाजवळ रविवारी सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. नागपूरहून सीजी/०४/१७७२ क्रमांकाचा ट्रक तूर घेऊन वेगात भंडाराकडे जात होता. त्याचवेळी भंडाराकडून नागपूरकडे एमपी/२०/जीए/१९८५ क्रमांकाचा ट्रक कुटार घेऊन वेगात येत होता. दोन्ही ट्रकांची समोरासमोर भीषण टक्कर झाली. जबरदस्त टक्कर झाल्याने इंधन टाक्या फुटून घर्षणाने आग लागली. चेसीसवर लाकडी जोडणी, कुटार, तूर तसेच इंधनही ज्वालाग्राही असल्याने आग क्षणात भडभडून पेटली. मोठा आवाज झाल्याने लोकांनी पोलिसांना कळविले.
अवघ्या काही मिनिटात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखडे, पोलीस निरीक्षक मिठाराम तायडे यांच्यासह मौदा पोलीस तेथे पोहोचले. कुटार भरलेल्या ट्रकमधील जुम्मन केदूखान (रा. सिवनी) याने कशीबशी उडी टाकली. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. पोलिसांनी काही अंतरावरील एनटीपीसीमध्ये संपर्क साधून अग्निशमन वाहन बोलावले. रस्त्याच्या बांधकामासाठी असलेल्या टँकरमधून पाणी घेऊन पेटत्या ट्रकांवर पाण्याचा मारा केला. मात्र आग विझवायला बराच वेळ लागला. अपघात झाल्यानंतर तूर घेऊन जात असलेल्या ट्रकमधील चालक व मालक घटनास्थळाहून पळून गेले.
आग विझल्यानंतर दोन्ही ट्रकचे चेसीस तेवढे उरले होते. कुटारच्या ट्रकमधील कॅबीनमध्ये डोकावले असता तेथील दृश्य पाहून पोलीसही हादरले. आतील मृतदेह जळून काळेठिक्कर पडले होते. दोन मृतदेहांचे केवळ कवटी व हाडे शिल्लक होती. पोलिसांनी कसेबसे ते गोळा करून उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविले. मौदा गावाच्या पूर्वेला रबडीवाला वळण असून त्या परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. एका बाजूनेच रस्ता सुरू होता. रस्त्यावरून वळण घेत असताना इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे पोलिसांना समजले. मरण पावलेल्या चौघांपैकी विक्की रज्जूखान, अनिल पंधरे, बबलूखान अशी तीन नावे पोलिसांना समजली. चवथ्याची ओळख पटलेली नव्हती. हे सर्व सिवनीचे राहणारे आहेत. अपघातानंतर वाहतूक खोळंबली होती.