महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्टच्या विविध नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरुन मेसर्स रविराज अ‍ॅण्ड कंपनी व भागीदार रवींद्र साकलासह तिघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निवृत्त पोलीस उपअधीक्षक काशिनाथ सौदागर तळेकर (वय ६२, मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेकर यांच्या वडिलांनी मेसर्स रविराज अ‍ॅण्ड कंपनीकडून कात्रज येथे बांधण्यात आलेल्या पतंग प्लाझा सोसायटीतील ‘जी’ विंग मधील दोन क्रमांकाची सदनिका पाच लाख चाळीस हजार रुपयांना खरेदी केली होती. त्याचे नोंदणीकृत खत दुय्यम निबंधक कार्यालयात जुलै १९९८ मध्ये करण्यात आले होते. त्या वेळी कंपनीचे भागीदार साकला यांनी तळेकर यांच्या वडिलांकडून गृहरचना सोसायटीच्या नोंदणीसाठी व शेअर्ससाठी पाच हजार रुपये घेतले होते. सदनिकेचा व्यवहार झाल्यानंतरही करारनाम्याची कागदपत्रे ही त्यांच्याकडेच होती. २००७ मध्ये तळेकर यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तळेकर यांना या करारनाम्याची कागदपत्रे सात-आठ महिन्यांपूर्वी मिळाली. ती पाहिल्यानंतर मेसर्स रविराज अ‍ॅण्ड कंपनीने महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट रुल्सच्या विविध नियमांचा भंग केल्याच्याचे दिसून आल्याने याबाबत भारती विद्यापाठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.