नोटाबंदीचा केंद्र सरकारचा निर्णय चांगला व फायदेशीर असून रोकडरहित व्यवहारातील प्रमाण वाढायला हवे. काळाच्या गरजेनुसार ते सर्वांनी शिकायला हवे. हे खरे असले तरी भारतात पूर्णपणे रोकडरहित व्यवहार अवघड आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.

मालेगाव येथे विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी भागवत यांचे सोमवारी सकाळी सेवाग्राम एक्सप्रेसने मनमाड रेल्वे स्थानकात आगमन झाले. त्यानंतर मनमाड येथील संघ कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी ते चार तास थांबले.

यावेळी भागवत यांनी नाशिक जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रातील संघ प्रचारक व कार्यकर्ते यांची स्वतंत्र बैठक घेऊन संघाच्या कामकाजाबाबत चर्चा केली. नंतर शहरातील उद्योजक व प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चात्मक संवाद साधला. यावेळी चर्चेत रोकडरहित व्यवहारांत ‘स्वाईप’वरील दोन टक्के कर आकारणीचा मुद्दा काहींनी मांडला. यावेळी भागवत यांनी नोटाबंदीचा निर्णय लाभदायक असल्याचे सांगितले.

भारतीय गृहिणीची घराघरातील बचत ही रोकड स्वरुपात असते. अडीअडचणीच्या काळात ती कुटुंबास व पर्यायाने देश हितास मदत करणारी ठरते. मात्र यापुढे सर्वांनीच रोकडरहित व्यवहार शिकण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. नोटाबंदी बरोबर शिक्षण, सहकार, उद्योग, शेती, आदिवासी भागातील कुपोषण आदी प्रश्नांबाबत उपस्थितांचे मत भागवत यांनी जाणून घेतले. संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.