शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज महाडमधील सामाजिक संस्था, व्यापारी, विविध राजकीय पक्षांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाड तालुका शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेला तालुक्यातील सर्व पक्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.
महाडमधील श्री वीरेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवसेनेच्या तालुका शाखेतर्फे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. सभेला आमदार भरत गोगावले, उपजिल्हा प्रमुख बिपिन महामुणकर, तालुकाप्रमुख जयवंत दळवी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर मोरे, रा. काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष विजय सावंत, तालुका अध्यक्ष सुभाष निकम, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संदीपभाऊ जाधव, काँग्रेसचे नगरसेवक महमदअली पल्लवकर, बशीर चिचकर, राष्ट्रवादीचे महेबूब कडवेकर, संदीप जाधव, रघुवीर देशमुख, आरपीआयचे उपजिल्हाध्यक्ष केशव हाटे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, पंचायत समितीचे सभापती विजय धाडवे, काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोहर शिंदे, श्रीमती पद्मा शिपूरकर, पोलादपूरचे जि. प. सदस्य चंद्रकांत कळंबे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य विजय सावंत, मनसेचे सतीशदादा देशमुख, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश मेहता, माधव मुंदडा, मेडिकल असोसिएशनचे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पद्माकर मोरे, माजी जि. प. सदस्य अमित मोरे, हिंदू जनजागृती समितीचे सुरेश पुरोहित, मिलिंद टिपणीस, रमेश पवार, सर्व नगरसेवक आदी मान्यवरांसह वेगवेगळय़ा राजकीय पक्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागांतूनही हजारो ग्रामस्थ बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला सर्व पक्षातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना बाळासाहेब यांच्याविषयी असलेली आत्मीयता, प्रेम भाषणांमध्ये व्यक्त करताना अनेकजणांना डोळय़ांतील अश्रू आवरता आले नाहीत. गेली पाच दशके महाराष्ट्रातील मराठी माणसाची अस्मिता जागविणाऱ्या या नेत्याने खऱ्या अर्थाने सर्वावर प्रेम केले. मराठी माणसाला अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची ताकद त्यांनी दिली. एक हात वर जाताच संपूर्ण महाराष्ट्र थांबत होता आणि तोच हात खाली आल्यावर पुन्हा सर्व व्यवहार सुरू होत होते, अशा या महान तपस्वीला कोटी कोटी प्रणाम. बाळासाहेब हे कट्टर राष्ट्रभक्त होते, जात-पात, उच-नीच हा धर्म त्यांनी कधीही पाळला नाही. सामान्यांतल्या सामान्याच्या हातामध्ये राज्याची सत्ता दिली. स्वत: कधीही सत्तेमध्ये गेले नाहीत. किल्ले रायगडावर ज्या वेळी ते आले होते त्या वेळी ते आपल्याकडे दोन दिवस वस्तीला होते, ही आठवण कायम मनामध्ये राहणारी असल्याचे पाचाडचे रघुवीर देशमुख यांनी या वेळी सांगताना बाळासाहेबांच्या स्वभावाची काही ठळक वैशिष्टय़े सांगितली. प्रभाकर मोरे, आमदार भरत गोगवले यांच्यासह अनेकांनी आपल्या भाषणांमध्ये बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.