‘‘कायदा व पार्टी असावी, कोयना धरण व ब्रह्मपुत्रेचे पाणी शेतीसाठी असावे, दुष्ट देशाचा (पाक) नायनाट करावा, पाकमध्ये भारताचा झेंडा लावण्यास तायप्पा गेणू सूर्यवंशीला परवानगी असावी, दुष्टांचा नायनाट करावा, दुष्काळी महाराष्ट्रासाठीच कायदा व पार्टी असावी’’.. मंत्रालयाकडे आलेल्या एका पत्रातील हा तपशील. कोणत्याही सामान्य माणसालाही हास्यास्पद वाटेल असा मजकूर असलेले हे पत्र राज्यशासनाने
मात्र गांभिर्याने घेतले आहे. मंत्रालयातील सचिवांनी तर आपल्या हाताखालच्या
विभागांना कामाला लावत या पत्रावर तातडीने अहवाल सादर करण्याचे आ देशच दिले आहेत.
ता. गे. सूर्यवंशी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना हे पत्र लिहिले आहे. त्याच्या प्रती पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राज्यपाल के. शंकरनारायण यांनाही पाठवल्या आहेत. त्याचा विषय आहे- ‘महाराष्ट्रासाठी अर्ज ऐसा जे सर्वच दुष्काळी महाराष्ट्रासाठी’ हा. त्यात तेरा मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यांचा एकमेकांशी ताळमेळ नाही.
या मागण्या गमतीशीर आहेतच. त्याहून गमतीशीर बाब म्हणजे मंत्रालयाने या पत्राची घेतलेली गंभीर दखल! एकीकडे नागरिकांच्या तक्रारी, मागण्यांची असंख्य पत्रे बेदखल राहत असताना मंत्रालयातील प्रशासनाने या पत्रावर मात्र अतितत्परता दाखवली आहे. मंत्रालयातील सूत्रांनुसार, सचिवांनी हे पत्र संबंधित विभागाकडे पाठवले आहे. त्यावर त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
पत्राचा प्रवास कसा झाला?
हे पत्र मंत्रालयात आले खरे, पण त्याचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या कार्यालयांना हे पत्र पाठवल्याचा उल्लेख त्यावर आहे. त्यामुळे हे पत्र कोणत्या कार्यालयाने खाली मंत्रालयापर्यंत पाठवले, याबाबत उत्सुकता आहे.

पत्रातल्या विचित्र मागण्या
*   कायदा व पार्टी असावी.
*    कोयना धरण व ब्रह्मपुत्रेचे शेतीसाठी जलसंपदा असावे.
*    चुकीचे कायदे व अडथळे दूर करावेत.
*    पाकिस्तानमध्ये भारताचा कायमस्वरूपी झेंडा असावा.
*    दुष्ट देशाचा (पाक) नायनाट करावा.
*   पाकमध्ये भारताचा झेंडा लावण्यास तायप्पा गेणू सूर्यवंशीला परवानगी असावी.
*    सर्वच गावांना ५० टक्के धरणाचे पाणी मिळावे.
*    भारताची प्रगती असावी, शेतीची प्रगती व्हावी.
*    ताबडतोब महाराष्ट्राची कामे करावीत.