भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ‘आम आदमी’ या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली असली तरी विदर्भात मात्र अण्णा हजारे यांचे काही समर्थक राजकारणात जाण्यास इच्छुक नाहीत तर काहींनी मात्र केजरीवाल यांच्या पाठिशी राहण्याचे निश्चित केले आहे. त्यातील काही कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांशी संबंधित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन पुकारल्यानंतर विदर्भात त्यांच्या आंदोलनाला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ज्यांना राजकारणात रस नाही असे अनेक कार्यकर्ते या आंदोलनाशी जोडल्या गेले. त्यांनी अण्णांच्या प्रत्येक आंदोलनात हिरीरीने सहभागी होऊन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. महाविद्यालयीन युवक-युवती या आंदोलनाशी जुळले असताना त्यातील अनेकांनी राजकारणात न जाता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई करण्याचा निर्धार केला होता. आंदोलनादरम्यान अरविंद केजरीवाल नागपुरात आले असताना त्यांनी इंडिया अंगेस्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. मात्र, केजरीवाल यांनी आम आदमी या राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर केजरीवाल यांचे निकटचे आणि ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’चे नागपूर विभागाचे प्रमुख अजय संघी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यांनी मात्र आम आदमी या नव्या राजकीय पक्षात जाणार नसल्याचे लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.
नागपुरात ज्या ज्यावेळी आंदोलन झाली त्यावेळी अंजय संघी यांनी आंदोलनाचे नेतृत्व करीत असताना ते अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्या पठिशी उभे राहिले. केजरीवाल नागपुरात आले असताना केजरीवाल यांचा मुक्काम संघी यांच्या निवासस्थानी होता मात्र, केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांच्याशी फारकत घेत राजकारणात पडणार नसल्याचे सांगितले. अण्णाच्या आंदोलनाशी जुळलेले अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षात न राहता अण्णांसोबत राहण्याचा निर्धार केला आहे. संघी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, केजरीवाल यांच्या दिल्लीमधील बैठकीसाठी शहरातील काही मोजकेच कार्यकर्ते गेले असून ते आज नागपुरात परतणार आहे. त्यामुळे उद्या इंडिया अंगेस्ट करप्शच्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यात कोण केजरीवाल यांच्या आम आदमी या पक्षात कोण सहभागी होईल आणि कोण होणार नाही हे निश्चित होईल. विदर्भात मोठय़ा प्रमाणात इंडिया अंगेस्ट करप्शनचे कार्यकर्ते असल्यामुळे अण्णांसोबत काम करायचे की केजरीवाल यांच्या ‘आम आदमी’ या राजकीय पक्षात प्रवेश करायचा याबाबत प्रत्येकाचे स्वतंत्र मत असून ते लवकरच स्पष्ट होईल असेही संघी म्हणाले.
इंडिया अंगेस्ट करप्शनचे जे कार्यकर्ते राजकीय पक्षात जाण्यास इच्छुक आहेत ते सध्या तरी विविध राजकीय पक्षाशी संबंधित आहे. दिल्लीमध्ये गेलेले काही कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती मिळाली. अण्णाच्या आंदोशनाशी जुळलेले सामाजिक कार्यकर्ते राम आखरे म्हणाले, सामान्य माणसांच्या समस्यांसाठी ‘आम आदमी’ या पक्षाची घोषणा करण्यात आली असून मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते या पक्षाशी जुळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.