‘वडेट्टीवार व पुगलिया गटात संघर्ष’ इंटक कार्यालयाची तोडफोड

शहर व जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व निवडणूक अधिकारी रामगोपाल भवानिया यांच्यासमोर विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार व माजी खासदार नरेश पुगलिया गटाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने दोन्ही गटात चांगलाच संघर्ष झाला. यावेळी इंटक कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पक्षाची स्थिती अतिशय दयनीय असतांना नेत्यांमधील या राडय़ामुळे काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता चांगलाच हतबल झाल्याचे चित्र येथे बघायला मिळाले.

चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस समितीच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार गटाने डीआरसी हेल्थ क्लब समोरील इंटक भवनात दुपारी दोन वाजता निवडणूक अधिकारी रामगोपाल भवानिया यांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेला वडेट्टीवार यांच्यासह शहर अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार सुभाष धोटे, डॉ.अविनाश वारजूकर, प्रदेश सचिव डॉ.आसावरी देवतळे, सुभाष गौर, विनायक बांगडे, सुनीता लोढीया, शिवा राव, महेश मेंढे, जिल्हा व शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

विश्रामगृहावर पुगलिया गटानेही बैठक बोलावली होती. परंतु भवानिया यांना गडचिरोली येथून चंद्रपुरात येण्यास उशीर झाला. त्यामुळे ते थेट इंटक भवनात बैठकीसाठी पोहोचले. बैठक सुरू असतांनाच पुगलिया गटाचे अ‍ॅड.अविनाश ठावरी, वसंत मांढरे, तारासिंग कलसी, देवेंद्र बेले आदी कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी म्हणून इंटक भवनात दाखल झाले. यावेळी पक्ष निरीक्षकांसमोरच वडेट्टीवार व पुगलिया गटात चांगलाच संघर्ष उडाला. या संघर्षांचे रूपांतर राडय़ात झाले व एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत दोन्ही गटाचे कार्यकर्ते पोहचले. यावेळी इंटक कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

‘घर को आग लग गई घर के चिराग से’

दोन गटातील या राडय़ावर भाषणात भवानिया यांनी ‘घर को आग लग गई घर के चिराग से’ या शब्दात तीव्र संताप व्यक्त केला. हाणामारी सोडून सर्वानी एकदिलाने काम करण्याचे आवाहन भवानिया यांनी केले.