अमरावती जिल्ह्य़ातील सात नगरपरिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत तीन ठिकाणी काँग्रेसला, दोन जागांवर विदर्भ जनसंग्राम, तर प्रत्येकी एका जागेवर प्रहार आणि भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले.
तीन नगरपरिषदांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. उर्वरित ठिकाणी नगराध्यक्ष अविरोध निवडले गेले. अंजनगाव सुर्जीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या हनिफाबी मो. शरीफ यांची निवड झाली. त्यांनी शिवसेनेच्या लक्ष्मी येऊल यांचा पराभव केला. हनिफाबी यांना १४, तर येऊल यांना ११ मते मिळाली. उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच देविदास नेमाडे यांची निवड झाली. त्यांनी काँग्रेसचे बंडखोर विनीत डोंगरदिवे यांना १४ विरुद्ध ११ मतांनी पराभव केला.
काँग्रेसचे तीन सदस्य फुटूनही सेनेला यावेळी सत्ता मिळवता आली नाही. गेल्या वेळी काँग्रेसकडे बहुमत असतानाही काँग्रेसचे बंडखोर आदेश बोबडे यांना नगराध्यक्षपद बहाल करून शिवसेनेने सत्तेत सहभाग घेतला होता. यावेळी मात्र काँग्रेसने शिवसेनेची दोन मते फोडून अपमानाचा सूड घेतला. शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्षपदी विदर्भ जनसंग्रामच्या सरिता खेरडे निवडून आल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलिमा वऱ्होकार यांचा पराभव केला. खेरडे यांना १०, तर वऱ्होकार यांना ७ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडली तरी काँग्रेसचे देवानंद जोगेकर निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे बंडखोर लीलाधर डोईजोड यांचा १० विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अंजली अग्रवाल यांची निवड झाली. त्यांनी भाजपचे सचिन जयस्वाल यांचा पराभव केला. अग्रवाल यांना १०, तर जयस्वाल यांना ६ मते मिळाली. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुचिका आठवले निवडून आल्या. त्यांनी अपक्ष नितीन गवळी यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपची दोन मते फुटली.
गेल्या निवडणुकीत भाजपकडे सत्ता होती. वरूडच्या नगराध्यक्षपदी विदर्भ जनसंग्रामचे रवींद्र थोरात, धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या अर्चना राऊत, अचलपूरच्या नगराध्यक्षपदी रंगलाल नंदवंशी, चांदूर बाजारच्या नगराध्यक्षपदी प्रहारच्या शुभांगी देशमुख यांची याआधीच अविरोध निवड झाली आहे.
 उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या अवधीपर्यंत या चार नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने मंगळवारी या नगराध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दर्यापूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर न्यायालयाचा स्थगनादेश आहे.