भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची वर्षपूर्ती जोरदार साजरी केली जात असतानाच नगर शहरात काँग्रेसने ‘अच्छे दिनची पहिली पुण्यतिथी’ मंगळवारी साजरी करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून या फलकाला जोडे मारण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सत्तेवर येऊन मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या दरम्यान मोदी व भाजपने देशातील जनतेला भरघोस आश्वासने दिली होती. यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही, किंबहुना त्या दिशेने वाटचालही सुरू केलली नाही. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे जनतेत केंद्र सरकारबद्दल फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे.
विविध घोषणांच्या जोरावरच भाजपने केंद्रातील सत्ता हस्तगत केली, मात्र पहिल्या वर्षांत तरी त्यांना या सर्वच घोषणांचा विसर पडलेला दिसतो. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही ‘अच्छे दिना’ची पहिली पुण्यतिथीच आहे. त्याचाच निषेध करून निदान पुढच्या वर्षांत तरी केंद्र सरकारने या आश्वासनांची आठवण ठेवून त्या दिशेने वाटचाल करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षा नलिनी गायकवाड, रिजवान शेख आदी या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.