सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाल्यामुळे स्थानिक काँग्रेसजनांमध्ये आत्मचिंतनास सुरुवात झाली असून, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके व शहराध्यक्ष धर्मा भोसले या दोघांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहेत. शेळके यांच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात शिंदे यांना तबब्ल २७ हजार ८२१ मतांची पिछाडी सहन करावी लागली होती. शेळके यांच्याकडे याच दक्षिण सोलापूरची जबाबदारी होती. तर सोलापूर शहरातही पक्षाची मोठी पिछेहाट झाल्यामुळे भोसले यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या दारुण पराभवाला स्थानिक काँग्रेस नेतृत्वाला जबाबदार धरत टिकास्त्र सोडत समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात वाळूमाफियांसह अन्य अवैध व्यावसायिकांचे प्रस्थ वाढले असून पक्षात त्यांचाच प्रभाव वाढला असून, प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसल्याचे खडे बोल अंत्रोळीकर यांनी सुनावले. हीच स्थिती यापुढेही कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची अवस्था आणखी बिकट राहील, अशी भीती व्यक्त करताना अंत्रोळीकर यांनी पक्षात बदल होण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे. अंत्रोळीकर हे दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर यांचे नातू आहेत.
लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारात त्यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी दक्षिण सोलापुरात नेत्यांनी राणा भीमदेवी थाटात भाषणे केली होती. परंतु प्रत्यक्षात प्रचारात समन्वय न ठेवता एकमेकांवर कुरघोडय़ा करण्याचे राजकारण खेळले गेले. दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्यात एकोपा नव्हता. अनेक नेत्यांनी स्वतंत्रपणे प्रचाराची यंत्रणा राबवताना स्वत:चाच स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. अखेर त्याचा फटका शिंदे यांना बसायचा तो बसलाच.
सोलापूर शहरातील पक्षाध्यक्ष धर्मा भोसले यांनीही पक्षाच्या पराभवामुळे नाचक्की झाल्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत शहर उत्तर भागात शिंदे यांना ४१ हजार ९१३ तर शहर मध्य भागात १९ हजार ७६८ इतक्या प्रचंड मतांची पिछेहाट सहन करावी लागली. मोदी लाटेबरोबरच पक्षांतर्गत गटबाजी, प्रचारात विशेषत: मतदानाच्या दिवशीची उदासीनता यामुळे मतदान घडवून आणण्यात अपयश आले. त्याची जबाबदारी स्वीकारत भोसले यांनी आपण नवी दिल्लीत सुशीलकुमार शिंदे यांना भेटून पदाचा राजीनामा दिला असून, हेच राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पाठवल्याचे सांगितले. भोसले हे २००८ पासून शहराध्यक्षपदावर कार्यरत होते.
जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब शेळके यांनी सांगितले, की पक्षाच्या बांधणीसाठी शक्य तेवढे प्रयत्न केले. सुशीलकुमार शिंदे यांना निवडून आणावयाचे होते. त्यात कमी पडलो. पक्षासाठी व शिंदे यांच्यासाठी काम करायचे होते. आता कोणासाठी काम करायचे? त्यापेक्षा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला बरा म्हणून आपण पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी नमूद केले. राजीनामा देताना त्यांनी अन्य कोणालाही जबाबदार धरले नाही. माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे जावई असलेले बाळासाहेब शेळके हे २००८ पासून पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत होते. शेळके यांच्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष धर्मा भोसले हेदेखील पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दरम्यान, येत्या २४ मे रोजी सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात येत असून त्या वेळी पक्षातील संभाव्य घडामोडींकडे राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे.