यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक
विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतांनाच येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढायची की, एखाद्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, याबाबत कॉंग्रेसमध्ये कमालीचा घोळ सुरू आहे.
पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसने उमेदवार कधीच उभा केल्याचा इतिहास नाही. नुटाच्या बी.टी.देशमुखांना दरवेळी काँग्रेसन पाठिंबा दिलेला आहे. मात्र, पाठिंबा देऊनही बी.टीं.नी कॉंग्रेसला नेहमी कैचीतच अडकवल्याची काँग्रेसची तक्रार आहे. म्हणूनच शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसने गेल्या वेळी प्रकाश तायडे यांना लढवले होते, पण त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. हा अनुभव लक्षात घेऊन लढावे की लढू नये, असा प्रश्न पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेससमोर आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मर्यादित आणि पक्षीय बांधीलकीचे जिल्हा परिषद नगरपालिकांचे सभासद मतदार असतात, त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार का लढवू नये, असा विचार आता काँग्रेस करीत आहे. या मतदारसंघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होऊन राष्ट्रवादीच्या संदीप बाजोरिया यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे. त्यांचा सहा वर्षांंचा कार्यकाल लवकरच संपुष्टात येत असल्याने या निवडणुकीत यावेळी आघाडी करून ही जागा राष्ट्रवादीने आपल्याला सोडावी, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. तसे झाल्यास आमदार संदीप बाजोरिया काय भूमिका घेणार, हा चच्रेचा विषय आहे. त्यांच्यासारख्या ‘हेवीवेट’ उमेदवारांशी टक्कर घेणारा एकही नेता सध्या काँग्रेसजवळ नाही. कारण, ही निवडणूक ‘लक्ष्मी’ दर्शनाशिवाय पार पडत नाही.
या मतदारसंघात पुसदच्या नाईक घराण्याचा शब्द अंतिम असायचा, त्यामुळेच पुसदमधून विजय पाटील चोंढीकर आणि नंतर डॉ. एन.पी. हिराणी हेच निवडून आले होते. त्यापूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख हे आमदार होते आणि तेही पुसदचे होते. याचा अर्थ, २४ वर्षांत पुसदकडेच आमदारकी होती. प्रथमच मनोहर नाईकांचा विचार न घेता अजितदादा पवारांनी संदीप बाजोरियांना उमेदवारी देऊन काँग्रेसच्या मदतीने निवडून आणले. आता मात्र चित्र बदलले आहे. ही जागा आपल्याला मिळावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे. मात्र, आघाडीत राष्ट्रवादीचा संदीप बाजोरिया यांच्यासाठीच हट्ट आहे. घोडा मदान जवळ नसले तरी निवडणूक रिंगणात कोण उतरणार, याची जबरदस्त चर्चा आहे. सध्या जिल्हा परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असून राष्ट्रवादीच्या डॉ. आरती फुफाटे यांच्याकडे अध्यक्षपद आहे. निभ्रेळ बहुमत एकाही पक्षाकडे नाही. सेना-भाजपची युती झाली तरी सत्ता मिळवण्याइतपत बहुमत होत नसल्याने हे दोन्ही पक्ष बाहेर उभे राहून मजा पाहत आहेत. शिवसेनेचे संजय राठोड मंत्री असले आणि भाजपचे जिल्ह्य़ात सातपकी पाच आमदार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ८ नगरपालिका, १६ पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेत त्यांचे बहुमत नाही. विशेष म्हणजे, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. आघाडीशिवाय त्यांना पर्याय नाही आणि आघाडीतील दोन्ही पक्षांमध्ये अलीकडे विळा-भोपळ्याचे सख्य निर्माण झाले आहे. खुद्द काँग्रेसमध्ये इतकी गटबाजी आहे की, जिल्हाध्यक्षपदी अद्यापही नवी नियुक्ती झालेली नाही. अशा वातावरणात संदीप बाजोरिया यांना टक्कर देऊ शकेल, विशेषत: खिसा रिकामा करण्याची तयारी असलेल्या आणि पक्षनिष्ठा जोपासणाऱ्या उमेदवारांच्या शोधात काँग्रेस आहे, तर राष्ट्रवादीत संदीप बाजारिया यांच्या नावावर कमालीचे ऐक्य आहे. गेल्या सहा वर्षांत राष्ट्रवादीच्या यशाचा त्यांनी वाढवलेला आलेख लक्षात घेता राष्ट्रवादी म्हणजे संदीप बाजोरिया, असे समीकरण झाले आहे. पक्ष वृध्दीसाठी बाजोरियांना आयुर्वम्यिाची उपमा दिली जाते. आयुर्वम्यिाला पर्याय नाही, हा वाक्प्रचार बाजोरियांबाबत लागू होत असल्याने काँग्रेस उमेदवार उभा करण्यात कितपत धाडस दाखवते, हा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चच्रेचा विषय आहे.
न.मा. जोशी