जिल्हा परिषदेच्या तीन गटांतील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने जागा राखली, राष्ट्रवादीला मात्र नामुष्कीचा सामना करावा लागला. या तीनपैकी दोन जागा तर त्यांना गमवाव्या लागल्याच, मात्र ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या बालेकिल्ल्यातील राजूरच्या जागेवर अनपेक्षितपणे भाजपने मुसंडी मारली. या पोटनिवडणुकीत भाजपला हा बोनस मिळाला, मात्र पाथर्डीतील मिरी-करंजी गटात त्यांनाही नामुष्कीचा सामना करावा लागला.
राहुल जगताप (कोळगाव, श्रीगोंदे), वैभव पिचड (राजूर, अकोले) आणि मोनिका राजळे (मिरी-करंजी, पाथर्डी) हे तिघे विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या तीन गटांत पोटनिवडणूक झाली. बुधवारी त्यासाठी मतदान झाले होते. शुक्रवारी मतमोजणी होऊन दुपारी निकाल जाहीर झाले.
यातील मिरी-करंजी व राजूर या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे होत्या, त्यांना या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. मरी-करंजी येथे शिवसेनेच्या बंडखोर अनुराधा कराळे विजयी झाल्या. राजूरमध्ये भाजपचे डॉ. किरण लहामटे विजयी झाले. मोनिका राजळे यांनी विधानसभा निवडणुकीतच भाजपमध्ये प्रवेश करून एेनवेळी येथील त्यांची उमेदवारीही मिळवली व निवडणूकही जिंकली. त्यांच्या पक्षांतरामुळे त्याच वेळी राष्ट्रवादीला धक्का बसला होता. मात्र राजूरमध्ये राष्ट्रवादीला मोठय़ाच नामुष्कीचा सामना करावा लागला. केवळ तालुकाच नव्हेतर ज्येष्ठ नेते पिचड यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला.
श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव गटातील जागा मात्र काँग्रेसने कायम राखली. आमदार राहुल जगताप यांचेच वर्चस्व असलेल्या या गटात भाजपच्या माध्यमातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र जगताप यांनी या गटावरील वर्चस्व कायम राखले.
कोळगावचा निकाल-
दत्तात्रेय पानसरे (काँग्रेस, विजयी)- ११ हजार ५९२, संतोष लगड (भाजप)- ७ हजार ६५८.
मिरी-करंजीचा निकाल-
अनुराधा कराळे (शिवसेना बंडखोर, विजयी)- ८ हजार ९२६, सिंधू मोहन पालवे (शिवसेना)- ५ हजार ९८०, मोनाली खलाटे (भाजप)- ३ हजार ६०७, प्रज्ञा पालवे (राष्ट्रवादी)- २ हजार ९४० व अमृता गवळी (अपक्ष)- ९७७.
भाजपची नामुष्की
मिरी-करंजी गटात गेल्या वेळी राजळे विजयी झाल्या होत्या. त्या आता भाजपमध्ये आहेत, मात्र पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्पर्धेतच राहिल्या नाहीत. हा गट भाजपचेच आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मतदारसंघात येतो. ते स्वत: आणि पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांनीही पक्षाच्या विजयासाठी जोरदार कंबर कसली होती. मात्र दोन आमदार, एक खासदार दिमतीला असूनही पक्षाचा उमेदवार येथे तिस-या क्रमांकावर गेला.
पती-पत्नीचे सामंजस्य
कोळगाव गटातील काँग्रेसचे विजयी उमेदवार दत्तात्रेय पानसरे मूळचे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर ही पोटनिवडणूक लढवली. त्यांच्या पत्नी अर्चना या तालुका पंचायत समितीच्या सभापती आहेत. त्या मात्र राष्ट्रवादीच्या आहेत.