परळीत राष्ट्रवादीविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
परळी नगरपालिकेत साडेचार वर्षे राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने अचानक आपला पवित्रा बदलत राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षाच्या कारभाराविरुद्ध रणिशग फुंकत सोमवारी पालिकेवर मोर्चा काढला. याच दरम्यान सत्तेचा उपभोग घेताना काँग्रेसला मोर्चा का काढावा वाटला नाही, असा खोचक सवाल राष्ट्रवादी नगरसेवकांनी केला. या पाश्र्वभूमीवर दोन्ही काँग्रेसमधील राजकीय वातावरण गरम झाले आहे.
येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आता सर्वच पक्ष स्वतंत्र ताकद निर्माण करण्यासाठी सामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरू लागल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे परळी पालिकेवर वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे बाजीराव धर्माधिकारी अध्यक्ष, तर काँग्रेसच्या मीरा ढवळे उपाध्यक्षा आहेत.
पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते प्रा. टी. पी. मुंडे यांच्या सहा नगरसेवकांच्या मदतीने राष्ट्रवादीने पालिकेची सत्ता ताब्यात घेतली. वर्षांला पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करीत काँग्रेसने सत्तेचा उपभोग घेतला. मात्र, आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आता सर्वच पक्ष स्वतची स्वतंत्र ताकद निर्माण करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष धर्माधिकारी यांच्या कारभाराविरुद्ध रणिशग फुंकत काँग्रेसने सोमवारी पालिकेवर मोर्चा काढला. प्रा. मुंडे, काँग्रेसचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी-कार्यकत्रे या वेळी उपस्थित होते. पालिका पातळीवर काँग्रेसच्या सहापकी ३ नगरसेवकांनी उघडपणे राष्ट्रवादीशी सोबत केल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला, तर साडेचार वष्रे सत्तेत विविध पदे उपभोगताना विकासकामांचा लाभ घेताना काँग्रेसच्या नेत्यांना मोर्चा का काढावा वाटला नाही, असा सवाल प्रा. मुंडे यांनी केला.