काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांनी शनिवारी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील विकास कामांसाठी ही भेट घेतल्याचे सातव यांचे म्हणणे आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊनच गडकरींच्या भेटीला गेलो होतो असे सातव यांनी नमूद केले.

हिंगोलीतील काँग्रेस खासदार राजीव सातव शनिवारी दुपारी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. माझ्या मतदार संघातील प्रलंबित विकासकामांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन गडकरींच्या भेटीला गेलो असे राजीव सातव यांनी सांगितले. अकोला- नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने मार्गी लावणे, तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाच्या प्रश्नावरही गडकरींशी चर्चा केली असे त्यांनी स्पष्ट केले.