जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित समोर ठेवून सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी राजकारण खेळले असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले आहे.
नाशिक पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या मंदाबाई निकम सभापतिपदी, तर शिवसेनेचे अनिल ढिकले उपसभापतिपदी बिनविरोध निवडून आले. मालेगावमध्ये सत्ता कायम राखण्यात शिवसेनेला यश आले असून सभापतिपदी सेनेचे धर्मराज पवार यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी सेना पुरस्कृत अनिता अहिरे या विजयी झाल्या आहेत. अद्वय हिरे यांची जनराज्य आघाडी विलीन झाल्यामुळे बळ प्राप्त झालेल्या भाजपला शर्थीचे प्रयत्न करूनही येथील पंचायत समितीवर सत्ता हस्तगत करण्यात यश मिळाले नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला या विधानसभा मतदारसंघातील सभापतिपदाच्या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागून होते. अनुसूचित जातीसाठी राखीव सभापतिपदी प्रकाश वाघ आणि उपसभापती जयश्री बावचे यांची बिनविरोध निवड झाली. दोघेही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. येवल्याशेजारील निफाडचे सभापतिपद राष्ट्रवादीच्या सुभाष कराड, तर उपसभापतिपद काँग्रेसचे राहुल बनकर यांनी बिनविरोध मिळविले. येवला व निफाड दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली. सिन्नर पंचायत समितीवर काँग्रेसने वर्चस्व कायम राखले. संगीता काठे यांची सभापतिपदी, तर राजेंद्र घुमरे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. दिंडोरीत राष्ट्रवादीच्या अलका चौधरी यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली; परंतु उपसभापतिपदी शिवसेनेच्या छाया डोखळे यांची दोन मतांनी निवड झाली. विशेष म्हणजे अलका चौधरी यांनीही डोखळे यांना मतदान केले. सटाण्यात काँग्रेस पुरस्कृत जिजाबाई सोनवणे, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे वसंतराव भामरे यांची निवड झाली. सुरगाण्याचा गड कायम राखण्यात माकपने यश मिळविले. सभापतिपद माकपने मिळविले असले तरी उपसभापतिपद शिवसेनेच्या मोहन गांगुर्डे यांनी मिळविले. कळवणमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या संगीता ठाकरे यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीचेच संजय पवार यांची बिनविरोध निवड झाली. नांदगावच्या सभापतिपदी काँग्रेसच्या विमल सोनवणे व उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या सुरक्षा केसकर यांची बिनविरोध निवड झाली. इगतपुरीवर काँग्रेस-राष्ट्रवादीने वर्चस्व कायम राखले. सभापतिपदी काँग्रेसचे गोपाळ लहांगे, उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे पांडुरंग वारुंगसे यांची बिनविरोध निवड झाली. येथील पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध निवड झाली. चांदवडमध्ये राष्ट्रवादीच्या अनिता जाधव सभापती, उपसभापती राष्ट्रवादीच्याच मनीषा जाधव, त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसचे गणपत वाघ सभापती, काँग्रेसचेच शांताराम मुळाणे उपसभापती झाले. पेठमध्ये शिवसेनेच्या जयश्री वाघमारे सभापतिपदी, तर सुरेश टोपले हे मनसेचे उपसभापती झाले.