नाशिक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसने १२ जागांवर विजय प्राप्त करत वर्चस्व राखले असले तरी सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आठ जागा मिळवत या बँकेच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यातील इतर जिल्हा बँकांच्या निवडणुकीचा विचार करता भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये तुलनेत अधिक जागा मिळविल्याचे लक्षात येते. दरम्यान, मतमोजणी संपुष्टात येत असताना सेना आमदाराच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात अर्वाच्च भाषेचा वापर करत रास्ता रोको केला.
शेतकऱ्यांचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चुरशीच्या निवडणुकीत मतपेटीतुन धक्कादायक निकाल बाहेर आले. माजी लोकप्रतिनिधींसह बँकेच्या अनेक माजी संचालकांना पराभवाला सामोरे जावे लागले. पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या काहीना मतदारांनी नाकारले. १० जागांवर आधीच अविरोध निवड झाली होती. उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक झाली. मतमोजणीनंतर पक्षनिहाय स्थिती स्पष्ट झाली. सर्वाधिक आठ जागा राष्ट्रवादीने तर काँग्रेसने चार जागा मिळविल्या. या निवडणुकीत सहा जागा मिळवत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षणिय यश मिळविले. शिवसेनेच्या वाटय़ाला दोन जागा आल्या.
काँग्रेस व राष्ट्रवादीने १२, भाजप व सेना ८ तर माकपने एका जागेवर आपले वर्चस्व सिध्द केल्याचे स्पष्ट झाले. वेगवेगळ्या पॅनलतर्फे रिंगणात उतरलेले राष्ट्रवादीचे धनंजय पवार, सचिव सावंत, किशोर दराडे, परवेझ कोकणी, गणपत पाटील, शिवाजी चुंबळे, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे हे तर काँग्रेसचे संदीप गुळवे, शिरीष कोतवाल, नामदेव हळकंदर हे विजयी झाले. महिला गटातील अन्य एका जागेवर काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव काही मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. या ठिकाणी फेर मतमोजणी केली जात असल्याने निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. माकपचे आमदार जिवा पांडू गावित हे विजयी झाले. भाजपचे खा. हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आ. अपुर्व हिरे, माणिकराव कोकाटे, केदा आहेर, अद्वय हिरे तर शिवसेनेचे आमदार अनील कदम आणि याच पक्षाचे बाहुबली पदाधिकारी सुहास कांदे हे विजयी झाले. निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार व भाजपवासी झालेले वसंत गिते, माजी आमदार अनील आहेर आदी दिग्गजांना पराभूत व्हावे लागले.
शिवसेना आमदार, कार्यकर्त्यांची दादागिरी
मतमोजणी केंद्राबाहेर एका कार्यकर्त्यांचा महिला पोलिसाला धक्का लागल्यावरुन उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याने संबंधिताला सुनावले. यावेळी सेना आमदार अनील कदम समर्थक कार्यकर्ते गोळा झाले आणि त्यांनी पोलिसांना खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ आ. कदम यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी महामार्गावर रास्तारोको सुरू केला. संबंधित पोलिसाने माफी मागावी अशी त्यांची मागणी होती. अर्धा ते पाऊण तासाच्या गोंधळानंतर अखेर त्या पोलीस कर्मचाऱ्याने माफी मागितल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको वेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात अर्वाच्च भाषेचा वापर केला.