ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने लढणार आणि लोकसभा निवडणुकीत आघाडी करणार, हे सूत्र अनेकांना मान्य नाही.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावर कसा काय तोडगा काढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीत शिवसेना-भाजपशी आघाडी करून जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने काँग्रेसला काही ठिकाणी सत्तेपासून दूर ठेवले. त्यांनीच जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसमध्ये आले म्हणून ओरड करणे योग्य नाही, असे बोलले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना काँग्रेसने विकत घेतल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाले.
त्यापैकी काहींना काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काँग्रेस-प्रवेश देऊन सत्तेत सामावून घेतले. त्यावरून राष्ट्रवादीत तणाव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विजयी सदस्य काँग्रेसमध्ये गेले, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेली नाही किंवा कारणे दाखवा नोटीसही बजावली नाही, पण आता त्यांचे राजीनामे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करा आणि नंतरच आघाडी धर्माबाबत बोला, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीत राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्गात ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व सहकार क्षेत्रातील निवडणुका राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधात लढल्या. काँग्रेस व राष्ट्रवादीची ही लढत आमनेसामने झाली. शिवसेना-भाजपशी समझोता करून राष्ट्रवादीने सिंधुदुर्गातील चार पंचायत समितीत वर्चस्व प्राप्त केले. त्यातील सावंतवाडी व वेंगुर्लेची सत्ता राष्ट्रवादीकडून काँग्रेसने हिसकावून घेतली आहे.
गावच्या सत्तेच्या वेळी आम्हाला शिवसेना-भाजपशी समझोता चालतो, मग आताच का नाही, असा प्रश्न भगवे झेंडे खांद्यावर घेण्यास अडथळे आणणाऱ्यांना विचारला जात आहे. त्यामुळे काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ मिळविताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.