पालिका निवडणुकीतील अपयशाचा धडा घेऊन आता नगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली कार्यकर्त्यांची गळती, भाजपचा वाढता प्रभाव व फुटलेल्या मतपेढीमुळे सत्ता मिळवताना दमछाक होणार आहे. त्याचबरोबर नगरच्या राजकारणात सत्ताकेंद्र म्हणून पुढे येणारे पालकमंत्री राम िशदे यांच्या नेतृत्वाची कसोटी यानिमित्ताने लागणार आहे.

नगरच्या राजकारणात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत नेहमी गटबाजी व पक्षांतर्गत स्पर्धा होती. साखर कारखाने, अन्य सत्ताकेंद्रांच्या बांधणीमुळे प्रत्येक पक्षातील तालुका तालुक्यातील नेत्यांच्या दोन ते तीन पिढय़ा सत्तेत राहिल्या. पण आता लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची जादू चालली नाही. नरेंद्र मोदी यांची लाट आली. त्याचा धसका घेऊन जिंकण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आप्पासाहेब राजळे, बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या आश्रयाला गेले. त्यामुळे स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे भाजपकडून आमदार झाले. पाचपुतेंना खेळ जमला नाही. प्रथमच पालकमंत्री िशदे यांच्या रूपाने भाजपला एक नेतृत्व मिळाले. जिल्हा परिषदेच्या ७३ जागांपकी ४० जागा मिळविण्यासाठी त्यांनी घोषणा केली. पूर्वी दोन्ही काँग्रेसकडे उमेदवारीसाठी रांगा लागत असे, पण आता भाजपाकडे गर्दी वाढली. शिवसेनेचे अस्तित्वही पणाला लागले. त्यामुळे आता दोन्ही काँग्रेसचे नेते सावध झाले असून आघाडीचा निर्णय त्यांनी केला आहे.

राम शिंदे यांच्या कामगिरीकडे लक्ष

जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची युती सेना, भाजपबरोबर होती. त्यामुळे पाच वर्षे राष्ट्रवादीने सत्ता ताब्यात ठेवली. कर्जत, जामखेड मतदारसंघातून निवडून येणारे मंत्री िशदे यांना दोन्ही तालुक्यात एकही जागा मिळालेली नव्हती. पण आता त्यांनी मंत्रिपदाचा लाभ उठवत कोटय़वधी रुपयांचा निधी आणला आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांनी त्यांना शह देण्याचे प्रयत्न चालविले असून प्रथमच मराठवाडय़ातील नेता नगरच्या राजकारणात लुडबुड करत आहे. अन् त्यांना दोन्ही काँग्रेसचे नेते साथ करीत आहेत. राज्यात िशदेंच्या वाढत्या प्रभावाला झटका देण्याचा सर्वाचाच मानस आहे. िशदे यांनी शिवसेनेची पिछाडी सुरू झाल्याने त्यांनी फारसे महत्त्व दिलेले नाही. संपर्क नेत्यांचे दुर्लक्ष, दुबळे जिल्हा नेतृत्व तसेच वाळू माफियांचा विळखा. यामुळे सेनेची अवस्था पारनेर वगळता अन्यत्र बिकट आहे. पारनेरमध्ये आमदार विजय औटी हे भाजपला बरोबर घेण्याच्या मन:स्थितीत नाही. बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी कर्डिले, राजळे, कोल्हे व पाचपुते या नेत्यांवर भाजपची मोठी मदार आहे.

काँगेस पक्षात विखे व थोरात यांचा तह झाला आहे. नाशिक विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे हे थोरातांचे मेव्हणे उभे आहेत. तर नगर दक्षिणेतून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांना लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे दोन्हीही नेत्यांनी सहमतीचे राजकारण सुरू केले आहे. आघाडी झाली तरच ते शक्य होईल. हा धोका सर्वानी ओळखला आहे. संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी व थोडय़ा फार प्रमाणात श्रीगोंदे येथेच काँगेस सक्षम आहे. पण श्रीरामपुरात माजी आमदार जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यात मतभेद आहेत. असे असले तरी किमान २० हक्काच्या जागा ते निवडून आणू शकतात. त्यात आणखी जिल्ह्य़ात पाच जागांवर त्यांना अपेक्षा आहे. दक्षिणेत श्रीगोंद्यात साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून धरले आहे. हा अपवाद वगळता अन्य १० तालुक्यांत काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. तोदेखील आघाडी होण्याचे एक प्रमुख कारण आहे.

राष्ट्रवादीतील शेवगाव नेवाशातील वाद अद्याप शमलेले नाही. माजी आमदार भानुदास मुरकुटे हे पक्षात असले तरी मनापासून कार्यरत नाहीत. अशा अनेक अडचणीच्या गोष्टी राष्ट्रवादीसाठी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला आधी घर दुरुस्त करून मगच निवडणुकीला सामोरे जावे लागेल.

विखेथोरात तह

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षांतर्गत मतभेद व गटबाजी सोडून दिली. पालिका निवडणुकीत त्यांनी आपसातील लढायांमुळे कसा फटका बसू शकतो याचा अनुभव घेतला. तर राष्ट्रवादीला उशिरा शहाणपण सुचले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यांना मोठे केले होते ते काही भाजपत गेले तर काही शिवसेनेत. पण त्यांच्यामुळे पक्षाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक झाल्याने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्याकडून नगरच्या राजकारणाची सूत्रे काढून घेतली. माजी मंत्री दिलीप वळसे यांच्याकडे ती सोपविली. त्यामुळे केवळ चमचेगिरी करून पुढारपण करणारे बाजूला पडले. माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अशोक काळे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याशी पुन्हा नव्याने संवाद सुरू केला. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार राहुल जगताप, सुजित झावरे, प्रताप ढाकणे यांची साथ होतीच पण आधी प्रस्थापितांना त्यांनी विश्वास दिला. त्यामुळे आज किमान निवडणुकीला सामोरे जाण्याची कुवत निर्माण झाली. अन्यथा आणखी काही नेते भाजपच्या गळाला लागले असते. विखे व थोरात या काँग्रेस नेत्यांशी त्यांनी आघाडीसाठी संवाद साधला. राज्यातील नेतृत्वही आता आघाडीला अनुकूल असल्याने नगरच्या राजकारणात प्रथमच गटबाजी थांबणार आहे. तसे घडले तर मात्र जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा लागणार नाही. पण पाडापाडीचा खेळ झाला तर मात्र तो मार्ग मोकळा होईल. अन् भविष्यात राजकारणाची सूत्रे ही प्रस्थापितांच्या हातून जायला वेळ लागणार नाही. धोका दोघांनीही ओळखला आहे.

भाजपची तयारी :  भारतीय जनता पक्षात पूर्वी मोठय़ा प्रमाणात गटबाजी होती. पण मंत्री िशदे यांच्या हातात एकहाती सत्ता आहे. जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्याशी त्यांचा संवाद आहे. पूर्वी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे या नेत्यांचा हस्तक्षेप असे. मात्र आता पंकजा मुंडे, खडसे यांचे फारसे काही चालत नाही. मित्रपक्षाचे नेते असलेल्या खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे यांची जादू जिल्ह्य़ात चालत नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे रिपब्लिकन पक्षाची युती असून त्यांना दोन जागा देण्यात येणार आहे. प्रस्थापित मराठा नेत्यांना बरोबर घेऊन दलित, वंजारी, धनगर व ओबीसींची मोट बांधण्यात भाजपला यश आले आहे. मात्र आता सत्ता मिळविणे हे अवघड असले तरी पक्षाची वाटचाल व बांधणी तसेच भविष्याच्या राजकारणाची मशागत मात्र चांगली सुरू आहे. निश्चलनीकरण, विविध जातींचे मोच्रे, मराठा आरक्षण, शेतमालाचे कोसळलेले भाव हे या निवडणुकीतील महत्त्वाचे प्रचारातील मुद्दे असतील.