मतपेढी नाही, जातीय समीकरणे विरोधात गेलेली, सहकाराचा प्रभाव संपलेला अशा एक ना अनेक कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पीछेहाट रोखता आलेली नाही. तर दुसरीकडे काँग्रेस भांडणांनी पोखरली. असे असूनही अन्यत्र जोरदार आगेकूच करत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे कमळ नगर जिल्ह्य़ात फुललेच नाही. फुटलेल्या घराला सावरता येणे शक्य असूनही दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी पाटीलकीचे भांडण सुरूच ठेवले आहे. पण त्यामुळे आता राज्यात नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेते हे स्वत:च्या मतदारसंघापुरतेच मर्यादित बनले आहे.

नगर हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. पक्षात दोन गट होते, माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचा एक गट तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या समर्थकांचा दुसरा गट. काँग्रेसचे विभाजन होऊन राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा रस्ता धरला. पण स्थानिक राजकारणात त्यांचे विखेंशी कधी जमले नाही. आता विरोधी पक्षनेतेपद राधाकृष्ण विखे यांच्याकडे आल्यानंतर थोरात हे जाहीरपणे टीका करू लागले आहे. जिल्हा परिषदेच्या दोन गटांत विखे समर्थकांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी दोन बंडखोर उभे केले. त्यापकी एकाला निवडून आणले. दोघांत तालुका व मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राचा हा वाद आहे.

नगर जिल्ह्य़ात काँग्रेसचे २३ उमेदवार निवडून आले असले तरी थोरातांचे पक्षचिन्हावर ७ तर अपक्ष १ असे ८ सदस्य आहेत. तर विखे यांचे १५ सदस्य आहेत. पूर्वी विखे हे थोरातांपेक्षा जिल्ह्य़ाच्या राजकारणात कमकुवत होते. पण आता त्यांचे नातेवाईक व हितचिंतक हे एक तर राष्ट्रवादीत आहेत किंवा भाजपमध्ये आहेत. साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा नागवडे या एकमेव बिनविरोध निवडून आलेल्या सदस्या थोरात यांच्याबरोबर उघडपणे राहू शकतील. पण आता माजी खासदार दादापाटील शेळके हे थोरात यांच्याबरोबर असले तरी त्यांचे पुतणे प्रताप शेळके हे विखे यांच्याबरोबर आहेत. निवडणुकीत विखे यांनी काँग्रेस उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे चिरंजीव सुजय यांनी प्रत्येक तालुक्यात सभा घेतल्या. थोरात यांनी मात्र संगमनेर सोडले नाही.  राहुरी, नगरने साथ दिली म्हणून विखेंचे सदस्य जास्त आहेत.  थोरात यांच्याशी माजी मधुकर पिचड, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार अशोक काळे यांच्याशी सख्य असले तरी ते राष्ट्रवादीत आहेत. तर आमदार स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे या भाजपत आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाख व भानुदास मुरकुटे हे सध्या तरी कुठल्याच पक्षात नाहीत. पण मुरकुटे यांचे विखेंशी भांडण राहिलेले नाही. तर गडाख हे स्वत:च्या राजकारणासाठी सोयीची भूमिका घेऊ शकतात. विखे यांचेही तसेच आहे. त्यांना मानणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, आमदार बाळासाहेब मुरकुटे हे भाजपत आहेत. आमदार भाऊसाहेब कांबळे व माजी आमदार जयंत ससाणे हे विखे यांच्याबरोबर आहेत. काँग्रेसच्या पडत्या काळात दोघांचेही समर्थक हे विखुरले गेले आहेत. जिल्ह्य़ात संगमनेर व राहाता वगळता काँग्रेस संपलेली असताना विखे यांनी ती सावरण्याचा प्रयत्न केला.  विखे यांच्यामुळे पक्ष पहिल्या क्रमांकावर येऊ शकला. असे असले तरी विखेंच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी थोरात आक्रमक झाले आहेत. दोघांच्या भांडणात नवीन समीकरणे झाली तर मात्र काँग्रेसची वाट बिकट असेल.  जिल्हा परिषद अध्यक्षपदाकरिता शालिनीताई विखे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे प्रयत्नशील आहेत. मात्र थोरात यांनी अनुराधा नागवडे यांचे नाव पुढे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या वादात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पत्नी राजश्री यांचे नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण गडाख त्यांच्या मार्गातील अडचण आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचा विखे विरोध राहिलेला नाही.

सहकाराचा प्रभाव आता संपला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात भाजपची हवा विस्थापितांना मानवते आहे. त्यामुळेच माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या आदिवासी तालुक्यातही कमळ फुलले. तनपुरे, माजी आमदार मुरकुटे, गडाख, काळे, घुले यांना भविष्यातही मोदी लाटेचा सामना करावयाचा आहे. दोन्ही काँगेसच्या राज्यातील नेतृत्वाचा प्रभाव मतदारांवर पडत नाही. जातीय समीकरणे विरोधी गेली. अद्याप मतदारांचा रोष कमी झालेला नाही. भविष्यातील राजकीय वाटचाल बिकट बनू नये म्हणून दोन्ही काँग्रेसची एकत्र येण्याची मानसिकता पक्की आहे.

पक्ष सावरण्याचा प्रयत्न

पूर्वी विखे व पवार यांच्यात संघर्ष होता. पवारांकरिता जिल्ह्य़ातील अनेकांनी तो केला. त्यात अनेकांचे बळी गेले. जे धावून आले त्यांनाच पुढे पक्षात छळले गेले. त्यामुळे आता नेतृत्वाचे कुणी फारसे ऐकत नाही. राजकीय अपरिहार्यता म्हणून प्रत्येक जण पक्षात टिकून आहे. त्यामुळे आता विखे विरोधी राष्ट्रवादीची भूमिका मवाळ झाली आहे. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विखेंना लक्ष्य करणे कमी केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करण्याची मानसिकता आता राष्ट्रवादीत नाही. माजी मंत्री दिलीप वळसे यांनी निवडणुकीतच काँग्रेसबरोबर काही तालुक्यात युती केली. त्यामुळे आता दोन्ही काँगेस एकत्र येण्याची मानसिकता पक्की असताना विखेंना शह देण्यासाठी थोरात हे पक्षपातळीवर लढत आहेत.

राष्ट्रवादीची कोंडी

  • आघाडीची सत्ता राज्यात असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्य़ात अनेक प्रयोग केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील लाटेनंतर आमदारकीसाठी ज्येष्ठ शंकरराव कोल्हे यांनी स्नुषा स्नेहलता तर माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांनी स्नुषा मोनिका यांना भाजपकडून उभे केले.
  • माजी मंत्री बबनराव पाचपुते हेदेखील त्यांच्या गळाला लागले. शरद पवारांचेही कुणी ऐकेना, स्थानिक राजकारणामुळे माजी खासदार प्रसाद तनपुरे व अशोक काळे हे पक्षात आले.
  • आता पक्षाला धनगर, वंजारी, माळी, मुस्लीम, दलित ही जातीची मतपेढी न राहिल्याने माजी खासदार गडाख व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राष्ट्रवादीऐवजी स्वतंत्र आघाडी केली. पक्षाच्या विरोधात जनमत असल्याने गडाखांच्या आघाडीला मोठे यश तर मुरकुटेंच्या आघाडीला काही प्रमाणात यश आले.