जिल्ह्य़ातील आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पाच ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. उर्वरित सात नगरपालिकांसाठी आघाडी करण्यास अनुकूल स्थिती आहे. काँग्रेस पक्ष जिल्ह्य़ातील सर्व नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देणार असल्याची माहिती जिल्हा प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी दिली.

काँग्रेस पक्ष एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव, बोदवड, सावदा या पाच नगरपालिका स्वबळावर लढविण्याची तयारी करत आहे. तर यावल, फैजपूर, चोपडा यासह अन्य ठिकाणी आघाडीसाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती त्यांनी दिली. ही निवडणूक पक्ष चिन्हावर लढविण्यास प्राधान्य दिले जाईल. नगरपालिकेसाठी उमेदवार निवडीचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. तालुकाध्यक्षांचे मत विचारात घेतले जाणार असून जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखतीस सुरुवात झाली. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निवडताना निवडून येण्याची शक्यता आहे किंवा नाही हा मुख्य निकष लावण्यात येईल, अशी पुष्टी त्यांनी जोडली. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी चोपडा व अमळनेर येथील आघाडीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. काँग्रेसकडे नेत्यांची मोठी फौज असून या निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपमधील वादाचा काँग्रेसला लाभ होईल. काँग्रेसचे पदाधिकारी एकदिलाने निवडणुका लढणार असल्याचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे. अन्य समविचारी पक्षांशी चर्चा केली जात आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पुढे येईल, असे त्यांनी सांगितले.